ब्रह्मगिरी पर्वतावरुन पडून मुंबईचा तरुण ठार

मित्रांसोबत पहाटेच्या सुमारास गेला होता फिरायला, नागरिकांच्या मदतीने शोधकार्य

Brahmagiri_hill
ब्रह्मगिरी पर्वत परिसर

नाशिक : ब्रह्मगिरी पर्वतावर गुरुवारी (दि.७) पहाटे फिरावयास गेलेल्या युवकाचा उंचावरून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी १० च्या सुमारास घडली. प्रणव धर्मासे (वय २६, रा. टिळकनगर, चेंबूर, मुंबई) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव धर्मासे हा दोन युवक व एक युवतीसोबत त्र्यंबकेश्वरला आला होता. त्र्यंबकेश्वर येथे पहाटेच्या सुमारास चौघे ब्रह्मगिरी पर्वतावर फिरत असताना ते उत्तरेच्या टोकाला असलेल्या दुर्गभांडार या अवघड किल्ला परिसराकडे गेले. सर्वजण जाताना सुरक्षित गेले, मात्र परतताना रस्ता चुकले. त्र्यंबकेश्वरच्या बाजूने असलेल्या कड्याने मार्ग शोधत नंदी खिंड या भागात ते आले. या ठिकाणी प्रणवचा पाय घसरला. तो थेट खाली कोसळला. दरम्यान, या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी ब्रह्मगिरीवरून खाली येऊन भातखळा परिसरात मदत मागितली. पोलीस पाटील यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिस हवालदार साळवी, जाधव यांनी मेटावरच्या युवकांच्या मदतीने शोध सुरू केला. मुक्तादेवी मंदिराच्या बाजूने सरळ किल्ल्याकडे गेले असता झाडाझुडपांमध्ये एका कारवीच्या झाडाला प्रणवचा मृतदेह आढळून आला. त्याचवेळी नाशिक येथून एका मदत पथकादेखील पाचारण करण्यात आले होते. मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.