घरमुंबईसोसायटीतील वृद्धांच्या लसीकरणासाठी तरुणांचा पुढाकार

सोसायटीतील वृद्धांच्या लसीकरणासाठी तरुणांचा पुढाकार

Subscribe

ज्येष्ठ नागरिकांची असहाय्यता ओळखून दिला मदतीचा हात

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कस यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यावर सरकारने प्राधान्य दिले. मात्र अनेक सोसायट्यांमधील एकाकी जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे अशक्य होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुलुंडमधील काही तरुणांनी त्यांच्या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत अवघ्या आठ दिवसांमध्ये 40 पेक्षा अधिकांचे लसीकरण केले. यामध्ये त्यांना लसीकरण केंद्रावरील अधिकार्‍यांकडूनही मोलाची साथ मिळाली.

मुलुंड पूर्वकडील मिठागर रोड येथे असलेल्या जयरामकृष्ण हौसिंग सोसायटीत 13 इमारती आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये 40 ते 50 लोक राहतात. मुलुंडमध्ये लसीकरण केंद्र हे मुलुंड पश्चिमेला असलेल्या रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये आहे. कोरोना लसीकरण मोहीमेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र जयरामकृष्ण हौसिंग सोसायटीमध्ये अनेक वृद्ध जोडपे एकटेच राहत असल्याने आणि लसीकरण केंद्र पश्चिमेला असल्याने त्यांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यामध्ये अडचणी येत होत्या. ही बाब सोसायटीमध्ये राहणार्‍या तेजस जोशी याच्या लक्षात आली. त्याने सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांना आपण मदत करू शकतो का? हा विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त केला. त्यातूनच तेजस जोशी, संकेत चाळके आणि प्रतिक सावंत या तरुणांनी सोसायटीतील नागरिकांना लसीकरण केंद्रांवर नेऊन त्यांचे लसीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयारी करून रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास जम्बो कोविड केंद्रामधील वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली. केंद्रावरील अधिकार्‍यांना या तरुणांनी त्यांची कल्पना सांगितली. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी तरुण पुढाकार घेत असल्याचे पाहुन त्यांनाही समाधान व्यक्त केले. त्यांना या तरुणांची कल्पना आवडली. लसीकरण केंद्रातील अधिकार्‍यांच्या भेटीतमध्ये ठरल्याप्रमाणे हे तरुण दररोज पाच ते सहा ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी घेऊन जायचे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर नेण्यासाठी सोसायटीतील विजय जानी यांनी स्वत: गाडी देत या तरुणांच्या कार्याला हातभार लावला. लसीकरण केंद्राच्या दरवाजापर्यंत त्यांच्या गाडीला जाण्याची परवानगी मिळाली होती. सर्व नागरिकांची ऑनलाईन नोंदणी अगोदरच करण्यात येत असल्याने लसीकरणासाठी पोहोचल्यानंतर केंद्रावरील कर्मचार्‍यांकडून त्यांच्यासाठी उत्तम सोय करण्यात येत आहे. यामुळे सर्वसाधारणपणे लसीकरणासाठी तीन ते चार तास लागत असताना जयरामकृष्ण सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांने एक तासांमध्ये लसीकरण होत असे. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांमध्ये 40 पेक्षा अधिक नागरिकांचे काही तासांमध्ये लसीकरण झाले. सहज व कोणत्याही त्रासाशिवाय लसीकरण झाल्यामुळे सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्याकडून मुलांचे कौतू करण्यात येत आहे.

- Advertisement -

सोसायटीतील तरुणांनी आम्हा वयोवृद्धांसाठी लसीकरणाची केलेल्या व्यवस्थेमुळे आम्हाला कसलाच त्रास झाला नाही. या मुलांनी समाजापुढे एक चांगले उदाहरण दाखवून दिले आहे.
– पंढरीनाथ ठाकूर, ज्येष्ठ नागरिक, जयरामकृष्ण हौसिंग सोसायटी

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -