शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज याचा हात; युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा मोठा दावा

संजय राऊत पाठोपाठ आता ठाकरे गटाच्या युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी मोठं वक्तव्य केलंय. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

Varun Sardesai

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे. यावरून आता मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलंय. ठाकरे गटाच्या युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी सर्वात मोठा दावा केलाय. त्यामुळे हे व्हायरल व्हिडीओ प्रकरण आता वेगळ्या वळणाला जात असताना दिसत आहे.

ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी आज सकाळी शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणात शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वे गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित केला होता. संजय राऊत पाठोपाठ आता ठाकरे गटाच्या युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी मोठं वक्तव्य केलंय. व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे याचा हात असल्याचा आरोप करत अंगुली निर्देश केलंय. त्यामुळे राज सुर्वेला या प्रकरणी अटक करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

यावेळी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, एखादी तक्रार गेल्यानंतर सगळ्यात आधी हा व्हिडीओ मॉर्फ झालाय की नाही हे तपासणं हे पहिलं कर्तव्य असतं. जर तो मॉर्फ झाला असेल तर खरा व्हिडीओ कुठे? याचा तपास केला जातो. तो खरा व्हिडीओ समोर आला पाहिजे. हा खरा व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवरून तश्याच्या तसा लाईव्ह केलेला आहे.” त्यामुळे शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकणात जर कुणाला अटक करायची असेल तर प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यांना अटक करा अशी मागणी वरूण देसाईंनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात राज सुर्वे हाच मुख्य आरोपी असल्याचा दावाच वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

वरुण सरदेसाई यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या व्हिडीओने राजकारण तापलं असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करत दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडीओ व्हायरल प्रकरणात पोलिसांनी मुंबई, कल्याण, पुण्यातून आरोपींना अटक केली आहे.