दीड महिन्यात शून्य मृत्यूचे २९ दिवस; तरी सतर्क राहण्याचे पालिकेचे आवाहन

दिवाळीच्या उत्सवी कालावधीत कोरोना विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात होईल ही शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या सुट्टीच्या कालावधीतही कोविड चाचण्या सुरु ठेवण्यात आले होते.

नवी मुंबई लसीकरण

दिवाळीच्या उत्सवी कालावधीत कोरोना विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात होईल ही शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या सुट्टीच्या कालावधीतही कोविड चाचण्या सुरु ठेवण्यात आले होते. तसेच नागरिकांची लसीकरणाअभावी गैरसोय होऊ नये, यादृष्टीने महापालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्रे कार्यान्वित ठेवण्यात आलेली होती. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तसेच मृत्यू दरातही मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसत असून ऑक्टोबर महिन्याच्या ३१ दिवसात १७ दिवस शून्य मृत्यूचे तसेच नोव्हेंबर महिन्याच्या २२ दिवसात १२ दिवस शून्य मृत्यूचे आहेत. अशाप्रकारे गेल्या दीड महिन्यात २९ दिवस शून्य मृत्यूचे आहेत. मागील १८, १९, २०, २१ या नोव्हेंबर महिन्याच्या सलग ४ दिवसात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे कोविड मृत्यूदर १.८९ टक्के इतका कमी झालेला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिसर्‍या लाटेचा धोका संपलेला नाही, हे लक्षात घेऊन कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने दररोज कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी होऊ दिलेले नाही.

सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळणार्‍या इमारतीत, सोसायटी व वसाहतीत सर्वांच्या चाचण्या करण्यात येऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. दररोज सरासरी ७ हजाराहून अधिक नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत २२ लाख २३ हजार ५६९ इतक्या कोविड चाचण्या करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शासन निर्देशानुसार आरटी-पीसीआर टेस्ट ६० टक्के आणि अन्टिजन टेस्ट ४० टक्के, असे चाचण्यांचे प्रमाण कायम राखले आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही ३० हून अधिक आहे. अशाप्रकारे रुग्णसाखळी खंडीत करण्यासाठी ट्रेसींग, टेस्टींग व ट्रिटमेंट अशा त्रिसूत्रीकडे बारकाईने लक्ष दिल्याने कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ न देणे व त्याचवेळी जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन लस संरक्षित होण्याकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे बारकाईने लक्ष आहे.

हेही वाचा – 

महासंचालक पदाच्या यादीतून संजय पांडेंचे नाव केंद्राने हटवले