नवी मुंबई-: मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील हवा गुणवत्तेबाबत (air quality) उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेने देखील तत्परतेने कार्यवाही सुरु केली आहे.पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबधित अधिकार्यांची तातडीने बैठक घेत डेब्रीज नियंत्रणासाठी भरारी पथके २४ तास अधिक कृतीशील करण्याचे तसेच बांधकाम ठिकाणी लक्ष केंद्रीत केले आहे. याचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय विशेष पथके त्वरित स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेप्रमाणे नवी मुंबई पालिकेने देखील हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडयाचे नियोजन सुरु केले आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ-१ उपायुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ-२ उपायुक्त डॉ.श्रीराम पवार, उपायुक्त दत्तात्रय घनवट, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी प्रत्यक्ष तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण व आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.
- शहरात ७ ठिकाणी हवा गुणवत्ता मापन केंद्रे कार्यान्वित असून याठिकाणच्या रिडींगचे दर दोन तासांनी निरीक्षण करावे व त्यामध्ये आढळणार्या रिडींगप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी, असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
- बांधकाम निर्माणाचा तपासणी अहवाल संकेतस्थळावर नियलित प्रदर्शित केला जाणार आहे.रस्ते, दुभाजक या ठिकाणीही स्प्रिंकलरव्दारे सफाई करुन धुळ कमी करणे तसेच १०० हून अधिक चौकांमध्ये बसविलेली कारंजी कार्यान्वित करुन धूळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
- उल्लंघन करणार्यांवर कारवाई
शहराचे पर्यावरण व हवा चांगली रहावी ही आपल्या सर्वांचीच प्राधान्याने जबाबदारी असून त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना गांभीयाने कराव्यात,असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्तेच्या मानकांचे उल्लंघन करणार्या व्यक्ती, संस्थांवर कारवाई करण्यात येईल,असेही सूचित केले आहे. - फटाक्यांना वेळेची मर्यादा
दिवाळी सणात फटाक्यांमुळे हवा प्रदूषण वाढते हे लक्षात घेता इकोफ्रेन्डली फटाक्यांचा वापर करावा तसेच उच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे रात्री ७ ते १० याच वेळेत फटाके वाजवावेत, असे नागरिकांना आवाहन करीत पोलिस व विभाग अधिकार्यांनी लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.