ऐरोली : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच ऐरोली विधानसभा मतदारसंघात मराठा फॅक्टर यशस्वी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या संख्येने नवी मुंबईत राहतो. या ठिकाणी 40 टक्के मराठा समाजाचे मतदान होते. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असल्यामुळे याच मराठा समाजाचा कौल ऐरोलीमध्ये निर्णायक ठरू शकतो, असे राजकीय अभ्यासकांना वाटते.
या विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात मतदारांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. त्यामुळे मराठा समाज ऐरोलीमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत असून हा समाज ज्या बाजूने कौल देईल तो ऐरोलीमधील आमदार होईल, अशी स्थिती असल्याकडे लक्ष वेधले जाते. ऐरोलीमध्ये गणेश नाईक हे आमदार असून ते पुन्हा विधानसभा निवडणूकीला सामोरे जात आहेत. गणेश नाईक हे आगरी समाजातील असून त्यांच्या पाठिशी आगरी समाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोहर मढवी हे देखील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आगरी समाजाच्या मतांचे विभाजन होऊ शकते. त्याचवेळी विजय चौगुले यांनी अपक्ष अर्ज भरल्याने आणि ते वडार समाजातील असल्याने वडार समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभे आहेत.
हेही वाचा… Ankush Kadam : शिवरायांचे स्वराज्य ऐरोलीत आणणार, ऐरोलीचे उमेदवार अंकुश कदम यांची ग्वाही
या सर्वांमध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते असून बहुतांश मराठा समाजाचा त्यांच्याकडे ओढा आहे. अंकुश कदम यांनी सुरुवातीपासूनच मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होऊन समाजसेवेची सुरुवात केल्याने मराठा चेहरा म्हणून ते लोकांच्या पसंतीला उतरले आहेत. ऐरोली मतदारसंघातील असे चित्र असताना मराठा समाज किंगमेकरच्या भूमिकेत आहे. स्थानिक मुद्द्यांना घेऊन मराठा समाजाची भाजपवर नाराजी आहे. या सर्वाचा फायदा किंवा तोटा या निवडणुकीत कुणाला होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
प. महाराष्ट्रातील मतदारांचा ओढा कुणाकडे?
ऐरोली विधानसभा मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातून आलेले माथाडी कामगार आणि कष्टकरी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या मतदानाचा फायदा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांना होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. त्यामुळे अंकुश कदम यांचे ऐरोली मतदारसंघातील पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.
(Edited by Avinash Chandane)