ऐरोली : परिवर्तन महाशक्तीचे ऐरोली मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश सखाराम कदम यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी मंगळवारी (12 नोव्हेंबर) कोपरखैरणेत जाहीर सभा घेतली. हजारोंच्या या सभेत ऐरोलीच्या मतदारसंघात शिवरायांचे स्वराज्य आणणार, अशी ग्वाही अंकुश कदम यांनी दिली.
अंकुश कदम यांनी अलीकडेच ऐरोली मतदारसंघाच्या विकासासाठी ‘स्वराज्याचा कर्तव्यनामा’ जाहीर केला होता. यातील काही मुद्द्यांना हात घालत संयोगिताराजे छत्रपती यांनी प्रस्थापितांना बाजूला सारून विस्तापितांना बळ देण्याचे आवाहन मतदारांना केले.
येथील स्थानिक मुद्दे, रोजगार निर्मिती, परवडणारी शिक्षण व्यवस्था, उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था, महिला सुरक्षा व सक्षमीकरण, गड-किल्ले संवर्धन, शहराचा विकास, दिव्यांग बांधव धोरण, ड्रग्जमुक्त नवी मुंबई या आणि अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करत संयोगिताराजे यांनी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या अंकुश कदम यांना विजयी करण्याचे आवाहन केले. अंकुश कदम हे सामान्य कुटुंबातून आल्यामुळे तेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे कदम यांना पाठबळ देणे, ही आपली जबाबदारी असल्याचे संयोगिताराजे छत्रपती यांनी कोपरखैरणेतील सभेत आवाहन केले.
एक कार्यकर्ता, दोन पक्ष
यावेळी अंकुश कदम यांनी घराणेशाही, गुंडगिरी आणि मक्तेदारी यावरून प्रस्थापितांवर जोरदार टिकास्त्र सोडले. नाईकांचा एकच कार्यकर्ता एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रचार करतो. सकाळी ऐरोलीमध्ये आणि संध्याकाळी बेलापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करतात, असा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चालणारे आणि सर्वांना न्याय देणारे स्वराज्य ऐरोलीमध्ये यावे, यासाठी सात किरणांसह पेनाची निब या निशाणीसमोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन अंकुश कदम यांनी केले. हजारोंच्या सभेमुळे ऐरोली मतदारसंघात नवा उत्साह दिसून येत आहे.
(Edited by Avinash Chandane)