फरार घोषित राष्ट्रवादी युवक अध्यक्षांची वाढदिवसाला हजेरी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष किशोर उर्फ अन्नु आंग्रे आणि त्यांचे बंधू राहुल आंग्रे यांच्या विरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दीड महिन्यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष किशोर उर्फ अन्नु आंग्रे आणि त्यांचे बंधू राहुल आंग्रे यांच्या विरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दीड महिन्यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अद्यापही पोलिसांच्या हाती न लागलेले आणि पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलेले राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे हे पक्षाच्या कार्यक्रमात त्याचप्रमाणे वास्तव्यास असणार्‍या दिघा परिसरात मोकटपणे फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. मात्र ते पोलिसांना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय वरदहस्त आणि दबावापोटी रबाळे पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगत युवक अध्यक्ष आंग्रे यांना पाठीशी घातले आहे. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली जात आहे.

अध्यक्ष किशोर उर्फ अन्नु आंग्रे

२३ नोव्हेंबर २०२१ रोजी युवक अध्यक्ष अन्नु आंग्रे व त्यांचे बंधू राहुल आंग्रे यांच्यावर रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक गावडे त्याचप्रमाणे ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी आणि आंग्रे यांच्या पत्नी गौरी आंग्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंग्रे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांवर केला होता. इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या अन्नू आंग्रे यांना बळ देत पाठिशी घातले होते.

राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे यांच्या विरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना फरार म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून तपासानंतर कारवाई केली जाईल.
– सुधीर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे, एमआयडीसी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आंग्रे दिघ्यातील संजय गांधीनगर येथील एका कार्यकर्त्याच्या घरी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतः वापरत असलेल्या वाहनातून शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आंग्रे शुभेच्छा देतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. व्हाट्सअ‍ॅपवरील अनेक ग्रुपवर त्यांच्या मोबाईल नंबरवरून दिन विशेषचे बॅनर पाठविले जातात. त्यामुळे युवक अध्यक्ष आंग्रे अद्यापही पोलिसांच्या कसे हाती लागले नाहीत?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय दबावामुळे आरोपीला अभय देत असल्याचे चर्चा सुरु आहे. अन्नु आंग्रे यांच्यावर नवी मुंबईसह ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये खून, खुनांचा प्रयत्न, अपहरण, खंडणीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक पक्षातील युवक सेल हा नवा कार्यकर्ता घडवत असतो. परंतु नवी मुंबई राष्ट्रवादी युवकाची जबाबदारी गुंड प्रवृत्तीच्या आंग्रे यांच्याकडे दिल्याने तेव्हा पासूनच युवकांमध्ये प्रेरणा घेण्यापेक्षा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठीने लक्ष घालून अभ्यासू व परिवर्तनशील नेतृत्व देण्याची मागणी एका गटाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा –

Maharashtra School: राज्यातील शाळा आणखीन १५ ते २० दिवस बंद राहणार; राजेश टोपेंची माहिती