नेरूळमध्ये टॅग केलेला पक्षी सापडला रशियामध्ये, तब्बल ५१०० किलोमीटरचा केला प्रवास

नवी मुंबईत दरवर्षी अनेक पक्षी हजारो किलोमीटरवरून स्थलांतरण करून येत असतात. त्यानंतर ते पुन्हा दुसरीकडे स्थलांतरित होत असतात. अशाच एका पक्ष्याचा अचंबित करणारा प्रवास समोर आला आहे.

देशातील १३९ वर्षे जुनी संशोधन संस्था असलेल्या बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) टॅग केलेला रेड शांक हा पक्षी रशियामध्ये सापडला आहे. बीएनएचएसने कॉमन रेड शांक सापडल्याबाबत पुष्टी केली आहे. हा पक्षी नवी मुंबईमधील टीएस चाणक्य पाणथळ प्रदेशात टॅग करण्यात आला होता. जवळपास ३० सेमी लांब असलेल्या या पक्ष्याने मुंबईपासून रशियातील अल्टाईपर्यंत तब्बल ५१०० किलोमीटर अंतर उड्डाण घेत प्रवास केल्याचे समोर आले आहे.

रशियन बर्ड कन्झर्वेशन युनियन (आरबीसीयू)च्या अ‍ॅलेक्सी इबेल यांना हा पक्षी तेथे दिसला. टॅग दिसल्यानंतर अ‍ॅलेक्सी यांनी बीएनएचएसला ई-मेल पाठवला. त्यानंतरच्या प्रक्रियेनंतर तो पक्षी आम्हीच टॅग केला होता याची पुष्टी झाली, असे बीएनएचएसचे संशोधक मृगंक प्रभू यांनी सांगितले. बीएनएचएसने ट्टिट करीत ही माहिती दिली आहे.

कॉमन रेड शांक आइसलँड, ब्रिटन, युरोप खंडातील बराचसा भाग, मध्य पूर्व आणि समशीतोष्ण आशिया (हिमालयात ४,५०० मीटरपर्यंत) येथील पाणथळ प्रदेशामध्ये घरटे बांधतात आणि हिवाळ्यादरम्यान आफ्रिका ते फिलिपाइन्समध्ये राहतात.

बीएनएचएसने टॅग केलेले पक्षी विविध ठिकाणी दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

बीएनएचएसचे मृगंक प्रभू यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या हवाई सुरक्षिततेचा भाग म्हणून फ्लाईट पॅटर्नचा अभ्यास करणार्‍या संशोधनांतर्गत त्यांनी टॅग केलेले काही पक्षी यापूर्वी मुंबईजवळील उरण व अलिबागमध्ये आढळून आले आहेत.