घरनवी मुंबईतळोजातील कंपन्यांवर वायू प्रदूषण नियंत्रक हवा; लोकायुक्तांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश

तळोजातील कंपन्यांवर वायू प्रदूषण नियंत्रक हवा; लोकायुक्तांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश

Subscribe

तळोजामध्ये वायू प्रदूषण करणार्‍या कंपन्यांवर वायू प्रदूषण नियंत्रक बसवण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने द्यावेत, असे आदेश लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी दिले आहेत. लोकायुक्त कानडे म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाने तळोजामध्ये वायू प्रदूषण करणार्‍या कंपन्यांचा शोध घ्यावा. हे प्रदूषण करणार्‍यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करावी. तळोजा परिसरात वायू प्रदूषण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. त्याचा अहवाल तीन आठवड्यांत सादर करावा.

तळोजातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी विशेष तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. या समितीत एक पोलीस, एक सनदी आणि एक पर्यावरण तज्ज्ञ असावा, असेही लोकायुक्त कानडे यांनी आदेशात नमूद केले आहे. तळोजा येथील उत्पादक संघटनेनेही याप्रकरणी प्रत्युत्तर सादर करावे. तळोजा परिसरातील वायू व जल प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल याचा खुलासा उत्पादक संघटनेने प्रत्युत्तरात करावा, असेही लोकायुक्तांनी सांगितले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी राजीव सिन्हा, सुनील पाटील आणि समीर पाटील यांनी लोकायुक्तांकडे अर्ज केला आहे. तळोजा परिसरातील केमिकल कंपन्यांमधून रात्रीच्या वेळेस विषारी वायू सोडला जातो. या परिसरात डम्पिंग ग्राऊंड आहे. तेथे कचरा जाळला जातो. त्यामुळेही वायू प्रदूषण होते. वायू प्रदूषणामुळे श्वसनास त्रास होतो, असा दावा अर्जात करण्यात आला आहे.

या अर्जावर लोकायुक्त कानडे यांच्यासमोर सुनावणी झाली. अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर अशाच प्रकारचा अर्ज केला होता. नदीपात्रात सोडल्या जाणार्‍या केमिकलयुक्त पाण्यामुळे जल प्रदूषण होत होते. राष्ट्रीय हरित लवादाने केमिकलयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जल प्रदूषण कमी झाले. तेथे वायू प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला गेला नाही, असे लोकायुक्त कानडे यांच्या निदर्शनास आले.

- Advertisement -

मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट, मेसर्स लासन्स् इंडिया प्रा. लि. व ग्लोबल मरिन एक्सपोर्य कंपन्यांतून रात्रीच्या वेळी सोडल्या जाणार्‍या विषारी वायूमुळे तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. नागरिकांना श्वसनाला त्रास होतो. यावर प्रतिबंध घालणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही जमणार नाही. त्यामुळे याला कोण जबाबदार आहे, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

तळोजातील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेतली आहे. त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला आहे. लवकरच ते यावरील उपाययोजनेचा अहवाल सादर करतील. या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अ‍ॅड. अभय पत्की यांनी लोकायुक्त कानडे यांंना सांगितले.

तज्ज्ञांची समिती नेमणे आवश्यक
तळोजा परिसरात रात्रीच्या वेळी केमिकल कंपन्यांमधून सोडल्या जाणार्‍या विषारी वायूची तपासणी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची समिती नेमणे आवश्यक आहे. या समितीने विषारी वायू सोडण्याला कोण जबाबदार आहे हेही शोधून काढायला हवे, असे मत लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -