मतदार यादीत घोळ! भाजपचा निवडणूक अधिकार्‍यांना घेराव

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसविल्याचा आरोप भाजपने केला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची कोरोनामुळे लांबणीवर पडलेली निवडणूक येत्या मार्च अखेरीस होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर ५ जानेवारी २०२२ रोजी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसविल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्यासमवेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ऐरोली विभाग कार्यालयातील तहसीलदार नायब, तहसीलदार आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना घेराव घातला. मतदार यादीतील बोगस नावे दूर करा, नव्याने मतदार यादी जाहीर करा, ज्या मतदारांची नावे इतर ठिकाणी आहेत, त्यांची नावे वगळा, अशी मागणी करत येत्या सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाने जर यावर निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी दिला आहे.

ऐरोली जी- विभाग कार्यालयाच्या आवारात निवडणूक विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले तहसीलदार शितल रसाळ, मतदार नोंदणी अधिकारी निशा कांबळे, अधिकारी समता सुर्वे यांच्याशी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत पुराव्यानिशी मतदार यादीतील घोळ निदर्शनास आणून दिला. त्याचप्रमाणे आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले. यावेळी ऐरोलीमधील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी प्रकाश मंत्री, नरेंद्र कोटकर, एडवोकेट बापू पोळ, राजेश मढवी, सुदर्शन जिरगे, अनिल नाकते, बोरकर, गोरख कोटकर, चारुदत्त ठाणाबिर, जितेंद्र पारख, कृष्णा तांबे, अमर सुतार, हिरामण नाईक, अर्जुन मोरे, वैशाली पाटील, जयश्री सुरवासे आदी मान्यवर उपास्थित होते.

ऐरोली विधानसभा हा ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. परंतु या मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून विरोधकांनी इतर ठिकाणची आणि बोगस नावे घुसडवली आहेत. डझनभर पुराव्यानिशी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. येत्या सोमवारपर्यंत याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास भाजप आंदोलन छेडेल. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात न्यायालयात धाव घेईल.
– अनंत सुतार, माजी स्थायी समिती सभापती, नमुंमपा

याविषयी अधिक माहिती देताना स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघातील ऐरोली परिसरातील १३ ते १५ प्रभागांमध्ये मतदार यादीत घोळ झाला आहे. दिघा विभागात असणाऱ्या मतदारांची नावे ऐरोली गावठाण प्रभागात टाकण्यात आली आहेत. तर ज्यांची नावे टाकण्यात आली आहेत, ती व्यक्ती मृत आहे. ज्यांनी नावे सुचवली आहेत, ती व्यक्तीदेखील मृत आहे. अशी नावे मतदार यादीत टाकल्याने बोगस नावांचा घोळ सुतार यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. इतकेच नाही तर मतदाराचे नाव तीन प्रभागात टाकण्यात आले आहे.

त्याचबरोबर ऐरोलीतील काही नावे दिघा विभागात तर दिघा विभागातील नावे ऐरोलीमध्ये मतदार यादीत असल्याचे सुतार यांनी पुराव्यानिशी सादर केले. ऐरोलीत मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत घोळ झाला असून विरोधकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचा आरोप सुतार यांनी केला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रभागांमध्ये मतदार यादीत कशाप्रकारे चुकीची नावे टाकण्यात आली. त्याचप्रमाणे मृत इसमांची नावे कशी काय टाकण्यात आली, असा सवाल करत अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. ऐरोली विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून बोगस नावे मतदार यादीत टाकून याठिकाणी जर मतदार वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर भाजप तो कायदेशीर पद्धतीने लढा देऊन आणून पडेल, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी तहसीलदार आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिला.

ठाणे भिवंडीतील नावे ऐरोलीत

ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या काही प्रभागांमध्ये ऐरोली परिसर वगळता ठाणे-भिवंडी-कल्याण डोंबिवली या शहरातील नागरिकांची नावे मतदार यादीत घुसवण्याचा अजब प्रकार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिला.

७० वर्षाच्या आजींची युवा मतदार नोंद

निवडणूक आयोगाने नवोदित तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभाग घेता यावा याकरता १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार यादीत नाव नोंदणीचे आवाहन केले होते. परंतु ऐरोलीत मतदार यादीत नवोदित तरुण यांच्यापेक्षा ७० ते ७५ वर्षीय ज्येष्ठांची तरुण मतदार म्हणून नोंद करण्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर ज्या नागरिकांचे ऐरोली येथील रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नाही. त्यांना देखील ऐरोलीच्या मतदार यादीत स्थान देण्याचा प्रताप समोर आला आहे.

हेही वाचा –

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू