युवक अध्यक्षांना बदनाम करण्याचे षडयंत्र; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांचा आरोप

धास्तावलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवते आणि परिवाराने आंग्रे यांच्या विरोधात खोटी तक्रारी दाखल करुन बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी केला आहे.

नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किशोर (अन्नू) आंग्रे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांचा राजकीय प्रभाव हा दिघा आणि नवी मुंबई परिसरात वाढत चालला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवते आणि परिवाराने आंग्रे यांच्या विरोधात खोटी तक्रारी दाखल करुन बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी केला आहे. नवी मुंबईतील शिरवणे गाव, नेरुळ येथे राहणारे पवन श्रीशैल मेलगडे यांनी दिघा येथील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये व्हिडिओ पार्लर व्यवसायाकरता गाळा घेतला आहे. पवन यांना धंदा सुरु करायचा असल्यास अन्नु आंग्रे यांनी दरमहा ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करुन त्यांचे बंधू आणि पाच साथीदारांनी मारहाण केल्याचा रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराबाबत बुधवारी राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. यावेळी राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, प्रवक्ते विक्रम शिंदे, महिला सेलच्या दिघा तालुकाध्यक्ष गौरी अन्नु आंग्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विक्रम शिंदे यांनी अन्नु आंग्रे यांनी काही वर्षापासून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. परंतू दिघा परिसरात गवते परिवार हे काही तरी खोदून काढत त्यांची आणि पक्षाची प्रतिमा मलीन करत असून याबाबत महाविकास आघाडीतील पक्षांच्या वरिष्ठांनी वेळीच तोडगा काढण्याची मागणी शिंदे यांनी केली. तर निरीक्षक प्रशांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीला जर कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला जाईल.

दाखल करण्यात आलेला हा गुन्हा बिनबुडाचा आणि खोटा असल्याचा दावा अन्नु आंग्रे यांच्या पत्नी गौरी आंग्रे यांनी केला आहे. राहुल आंग्रे यांचा मारहाणी करतानाचा व्हिडिओ जरी समोर आला असला तरी ही मारहाण त्या ठिकाणी सुरु असलेल्या चुकीच्या व्यवसायाबद्दल जाब विचारताना केल्याचे स्पष्ट केले. मारहाणीऐवजी खंडणीचा गुन्हा पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरुन केला. या प्रकरणाला खतपाणी घालणार्यांचा पोलीस शोध का घेत नाहीत?, असा सवाल गौरी आंग्रे यांनी उपस्थित केला आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी तक्रारादाराने सादर केलेल्या पुराव्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले.

हेही वाचा –

खोटी कागदपत्रे देऊन प्रकल्प बाधितांच्या घरांमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहा जणांवर गुन्हे दाखल