मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातग्रस्तांना मदतीस गेलेल्या देवदूतांवर नियतीचा घाला

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले सुदैवाने बचावले

Destiny hit the angels who went to help the victims of the Mumbai-Pune Expressway accident
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातग्रस्तांना मदतीस गेलेल्या देवदूतांवर नियतीचा घाला

अनेकदा भीषण अपघात होतात. यावेळी तातडीने त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करणाऱ्या रुग्णसेवकांचाच नियतीने घात केला आहे. हायवेवर आधी झालेल्या एका अपघातग्रस्तांना अॅम्ब्युलन्स आणि आवश्यक मदत देण्यासाठी गेलेल्या दोन रुग्णसेवकांनाच दुस-या अपघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्देवी घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर पनवेपासून पुण्याच्या दिशेने साधारण आठ किमी परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट टॅक्सीला कंटेनरने मागून धडक दिली. त्याच दरम्यान तेथे पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते (26) आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले आणि इतर दोन जण झालेल्या अपघातात मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले होते.

 

त्यावेळी अचानक मागून भरधाव वेगात आलेल्या बंद बॉडीच्या ट्रक ने मर्सिडीजला धडक दिली. या धडकेत पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या समवेत असलेले प्रथमेश बहिरा (24) यांचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत हर्षद खुदकर हे जखमी झाले. त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले हे सुदैवाने अपघातातून बचावले. या अपघातातील जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघात घटनेनंतर आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळस्पे, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी, डेल्टा फोर्स आदी कर्मचा-यांनी मदत केली. पोलिसांनी तात्काळ ट्रक ड्रायव्हर ला अटक केली असून त्याला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. व याबद्दल अधिक तपास सुरु आहे. अशी महिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी दिली.