दिघा स्मशानभूमी स्थलांतरित केल्यास आंदोलन; भाजपचा पालिकेला इशारा

दिघा मध्यवर्ती स्मशानभूमीचे स्थलांतर करू नये, म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोहर गांगुर्डे यांना भाजप दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह ठाकूर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

दिघा मध्यवर्ती स्मशानभूमीचे स्थलांतर करू नये, म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोहर गांगुर्डे यांना भाजप दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह ठाकूर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. पालिकेने जर स्मशानभूमी हटविण्याचा प्रयत्न केला, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजपने दिला आहे. याविषयी भाजपचे त्रिभुवन सिंह ठाकूर म्हणाले की, दिघा विभागात मागील ६० ते ७० वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यासाठी दिघा, आंबेडकरनगर येथे हिंदू बांधवांसाठी दिघा मध्यवर्ती स्मशानभूमी उभारण्यात आली. तसेच अनेक वेळा महापालिकेच्या माध्यमातून कोटी रुपये खर्च करून दिघा मध्यवर्ती स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले आहे.

महापालिकेच्या माध्यमातून स्मशानभूमी अद्यावत करण्यात आली आहे. परंतु दिघा मध्यवर्ती स्मशानभूमीच्या बाजूला काही विकासकांनी टोलेजंग इमारती बांधल्या असून विकासकांच्या घरांची विक्री होत नसल्यामुळे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी हिंदू बांधवांच्या भावनेचा विचार न करता ही स्मशानभूमी स्थलांतर करण्यासाठी पत्र व्यवहार केला जात आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून मिळाली असल्याचे ठाकूर म्हणाले.

दिघा मध्यवर्ती स्मशानभूमीचा आजूबाजूचा संपुर्ण परिसर हा हिंदू बांधवांनी वसलेला आहे. दिघा विभागात हिंदू बांधवांची लोकसंख्य जास्त असून ही हिंदू स्मशानभूमी योग्य ठिकाणी व मध्यवर्ती भागात असून आजूबाजूच्या विभागातून देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिक या ठिकाणी येतात. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनेचा विचार करून दिघा मध्यवर्ती स्मशानभूमी ही स्थलांतरित करण्यात येऊ नये. स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अद्यावत करावी. जर महापालिकेच्या माध्यमातून दिघा मध्यवर्ती स्मशानभूमी स्थलांतरित करण्यात येत असेल. तर याविरोधात हिंदू बांधवांच्या हक्कांसाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.

हेही वाचा –

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ