घरनवी मुंबईकोरोनाला हलक्यात घेऊ नका

कोरोनाला हलक्यात घेऊ नका

Subscribe

वेध परिसराचा

कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नवी मुंबई महानगरपालिकेची आता करडी नजर आहे. गृह विलगीकरणातील कोरोना बाधीत घराबाहेर पडल्यास कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोरोना बाधीतांच्या संख्येत मागील १० दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित कोव्हीड व स्वच्छ सर्वेक्षणाच्या आढावा बैठकीप्रसंगी सर्व विभागांचे नोडल अधिकारी, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करण्याविषयी नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही अनेक नागरिक बेजबाबदारपणे या कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करताना आढळत असून आपले स्वत:चे व इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. अशा नागरिकांवर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे, मात्र या कारवाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

- Advertisement -

याकरिता प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी पोलीसांसह नेमलेली दक्षता पथके अधिक प्रभावीपणे कामगिरी करतील याकडे काटेकोर लक्ष देत या पथकांनी तिन्ही शिफ्टमध्ये धडक कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. लग्न व इतर समारंभाची माहिती महानगरपालिकेस देणे आवश्यक आहे. लग्न व इतर समारंभ होणारी सभागृहे ही कोरोना प्रादुर्भावासाठी अत्यंत जोखमीची ठिकाणे असून विभाग अधिकारी यांनी दररोज आपल्या क्षेत्रातील ४ विवाह कार्यालये व बेंन्क्वेट हॉल यांना भेटी देऊन जाहीर केलेल्या ५० व्यक्तींच्या निर्बंधापेक्षा एकही माणूस अधिक आढळल्यास 50 हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. गर्दीच्या संख्येचे व सुरक्षा नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही लग्न समारंभ असलेल्या यजमानांची व समारंभ आयोजकांप्रमाणेच सभागृह व्यवस्थापनांचीही आहे हे लक्षात घेऊन अधिक मोठ्या प्रमाणावर नियमभंग आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात यावा असे आयुक्तांनी स्पष्ट केले. अशाचप्रकारे एखाद्या सामाजिक, राजकीय कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर समुह जमा होऊन नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या सभागृह , बेन्क्वेट हॉलमध्ये आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमाची माहिती सभागृह व्यवस्थापनांनी संबंधीत विभाग कार्यालयास देणे आवश्यक असून तशाप्रकारे सभागृह व्यवस्थापनांना सूचना द्याव्यात व या कार्यक्रमांप्रसंगी महानगरपालिकेचा कर्मचारी वा दक्षता पथक यांच्यामार्फत त्याठिकाणी करडी नजर ठेवली जावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्येही ५० टक्के संख्या मर्यादेचे पालन केले जात असल्याबद्दल खात्री केली जावी आणि कोविड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात यावी असे आयुक्तांनी सूचित केले.
एपीएमसी मार्केटमध्ये पोलीसांसह दिवसरात्र दक्षता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

- Advertisement -

मार्केट, वर्दळीची ठिकाणे याठिकाणी विशेष लक्ष ठेऊन कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या नागरिकांवर अजून मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाया करण्यात याव्यात. यामध्ये प्रामुख्याने शहरातील सर्वात जोखमीचे क्षेत्र असणारे ए.पी.एम.सी. मार्केट तिन्ही शिफ्टमध्ये सुरु असल्याने त्याठिकाणी स्वतंत्र दक्षता पथके दिवसरात्र कार्यरत ठेवण्यात यावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. कन्टेनमेंट झोनचे काटेकोर पालन करीत प्रतिदिन ३००० कोरोना चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाबाधीत व्यक्ती सापडल्यास त्याठिकाणी कंन्टेनमेंट झोनच्या नियमानुसार फलक लावणे, निर्जंतुकीकरण करणे, आवश्यकतेनुसार सिलींग करणे अशी प्रक्रिया राबवावी तसेच कोरोना बाधीताच्या निकटच्या संपर्कातील 20 पेक्षा जास्त व्यक्तींचा शोध घ्यावा त्याचप्रमाणे दैनंदिन कोव्हीड १९ चाचण्यांमध्येही वाढ करून आठवड्यात प्रतिदिन ३००० पेक्षा जास्त चाचण्यांचे लक्ष्य गाठावे असेही आयुक्तांनी सूचित केले.

गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित घराबाहेर पडल्यास कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची यादी प्राप्त करून घेऊन त्यांच्या पुढील ७ दिवसाच्या अलगीकरण कालावधीवर लक्ष ठेवावे असे निर्देश देतानाच घरीच विलगीकरणात राहिलेली कोरोनाबाधीत व्यक्ती कोणाच्याही संपर्कात येणे कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने धोक्याचे असून अशा व्यक्तींवर घराबाहेर दिसल्यास कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यावा असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले.
यापुढील काळात विभाग कार्यालय निहाय होणा-या कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामाचा आढावा दररोज संघ्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचारासाठी १२०० बेड्स क्षमतेचे कोव्हीड उपचार केंद्र सिडको एक्झिबिशन सेंटर येथे कार्यान्वित असून भविष्यात अडचण येऊ नये म्हणून राधास्वामी सत्संग व एक्पोर्ट हाऊस येथील कोरोना केंद्रे पुन्हा सुरु करण्याची तयारी करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. कोव्हीड १९ आणि स्वच्छ सर्वेक्षण बाबतच्या दंडात्मक कारवाया संयुक्तपणे एकाच दक्षता पथकांकडून प्रभावीपणे करण्यात याव्यात अशा सूचना देताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांनीही कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून कोव्हीड प्रतिबंधासाठी आपले संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -