घरनवी मुंबईएपीएमसीत आंब्याची आवक वाढली; अवकाळी पावसाचा परिणाम

एपीएमसीत आंब्याची आवक वाढली; अवकाळी पावसाचा परिणाम

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी बाजार समितीच्या तुर्भे येथील फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर कोकणासह इतर राज्यातील आंब्याची मार्च ते मे महिन्यात आवक होते.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी बाजार समितीच्या तुर्भे येथील फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर कोकणासह इतर राज्यातील आंब्याची मार्च ते मे महिन्यात आवक होते. राज्यातील कोकण पट्ट्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा आंब्याला बसला आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदारांनी हापूस आंब्याची काढणी लवकरच करुन घेतली आहे. एपीएमसीच्या फळ बाजारात सर्वाधिक ७२ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. तर आगामी कालावधीत आंबा पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी काढलेल्या आंबा बागायतदार बाजारात पाठविणार असल्याने हापुसचा भाव घसरणार असल्याची व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. देवगड येथील अल्फोन्सोचा भाव प्रति बॉक्स ५०० ते ५००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

कोरोना महामारीच्या दोन ते अडीच वर्षात शेती व बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने कृषी उत्पन्न बाजाराने पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. तुर्भे येथील कांदा-बटाटा, धान्य बाजार, फळ बाजारात मालाची आवक वाढली असून घाऊक विक्रेत्यांची गर्दी देखील वाढली आहे. एकीकडे फळ बाजाराला उभारी देणारा आंब्याचा मोसम हा सुरु झाला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातून आंबा, कलिंगड, अननसाची आवक वाढली आहे. कोकणातील हापूस आंबा देखील गुढी पाडव्याच्या मुहूर्तापासून एपीएमसीत दाखल झाला आहे. मात्र आंबा पिकाला निसर्गाचा कौल मिळालेला नाही. हिवाळ्यात पडलेल्या अतिथंडीमुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला आहे. तर त्यानंतर मागील आठवडाभरापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हापूस आंब्याची कळा उतरवली आहे. गेली दोन दिवस कोकणातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर पुढील चार दिवस आणखी पाऊस पडणार असल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला हापूस आंबा लवकरात लवकर उतरवून तो घाऊक बाजारात पाठविण्याची लगबग सुरू झाली आहे.

- Advertisement -

कोकणात पडलेला पाऊस आणि इतर ठिकाणी वेधशाळेने वर्तविलेला हवामन बदलाचा फटका हा फळांचा राजा असणार्‍या आंब्यासह इतर शेत मालाला बसला आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंब्याची सर्वाधिक आवक एपीएमसीत झाली. येत्या काही दिवसात हवामानाचा फटका हापूस आंब्याला बसल्याने आवक वाढणार असून दर कोसळणार आहेत.
– संजय पानसरे, संचालक, एपीएमसी

तुर्भे येथील फळ बाजारात या हंगामातील आणि मागील वर्षांच्या हंगामापेक्षा जास्त म्हणजेच ७२ हजार पेट्या एका दिवसात दाखल झाल्या आहेत. पावसाचा फटका हाताशी आलेल्या आंब्याला बसू नये. यासाठी बागायतदारांनी बाजारात हापूस आंबा पाठविला असला तरी त्याला कमी भाव मिळणार असल्याचे व्यापारी चिंतातूर झाले आहेत. त्यातच आवक वाढल्याने आंब्याच्या किंमतीत घसरण होणार असल्याचे विक्रेते अशोक पाटील यांनी सांगितले. येत्या १५ मेपर्यंत मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याच्या पेट्या घाऊक बाजारात येणार आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा यंदा कोकणासह राज्यातील इतर भागातून बाजारात येणार्‍या आंब्याला बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राणा प्रकरणात देवेंद्र फडणवीस उघडे पडलेत – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -