नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालय अंतर्गत असणार्या सेक्टर-७ येथील रुग्णालयासाठी आरक्षित असणार्या भुखंडावर भाजी विक्रेत्यांनी विनापरवाना बस्तान मांडले आहे. पालिकेने आरक्षित ठेवलेल्या अनेक भुखंडावर सध्या फेरीवाल्यांनी डोळा ठेवला आहे. घणसोलीत या भुखंडावर भाजी विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याचा विसर पालिकेला पडला आहे की काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शहराची निर्मिती करत असताना सिडकोने अनेक भुखंड नागरी विकास प्रकल्प, क्रीडागंण, आरोग्य सेवा, वाहनतळ, उद्यानासाठी आरक्षित ठेवले आहेत. त्यानंतर पालिकेकडे हे भुखंड हस्तांतरीत करण्यात आले आहेत. पालिकेने या भुखंडांवर आरक्षणाचे फलक देखील उभारले आहेत. मात्र या भुखंडाचा वापर न झाल्याने पालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडावर फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.
हेही वाचा…Ambadas Danve on Congress : कॉंग्रेसचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडला; काय म्हणाले दानवे
घणसोलीतही पालिकेने सेक्टर ७ परिसरात रुग्णालयासाठी आरक्षित ठेवलेल्या भुखंडावर या भुखंडावर पावसाळयात मोठया प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. भुखंडावर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळया आणि गेट हा गंजल्याने काढून टाकण्यात आला आहे. त्यातच या ठिकाणी रस्त्यावर बसणार्या भाजी विक्रेत्यांनी या मैदानावर अतिक्रमण केले आहे. गेट तोडून भाजी विक्रेत्यांनी शिरकाव केला आहे. भाजी विक्रेते, कांदा बटाटा विक्रेत्यांनी मागील काही महिन्यांपासून विनापरवाना व्यवसाय सुरु केला आहे.
हेही वाचा…Panvel Municipal Corporation : पनवेल महापालिकेचा कारभार 10 दिवसांत पेपरलेस, कागदपत्रे गहाळ होण्याचा धोका संपणार
पालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडावर अतिक्रमण करुन हा भुखंड गिळंकृत करण्याचा डाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घणसोलीतील अतिक्रमणपथक इतर ठिकाणी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करते, मात्र आरक्षित भुखंडावर अतिक्रमण त्यांच्या निदर्शनास कसे आले नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करीत कारवाईची मागणी केली आहे.
(Edited by Dnyaneshwar Jadhav)