राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर लढण्यासाठी ‘एकला चालो रे’ची जोरदार तयारी केली आहे.

आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर लढण्यासाठी ‘एकला चालो रे’ची जोरदार तयारी केली आहे. नेरूळ तालुक्यात काँग्रेसकडून संघटना बांधणीवर गेल्या काही महिन्यात जोर दिला जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मारूती रामचंद्र माने यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह कामगार नेते व नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ येथील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मारूती माने यांच्याकडे युवकांचे मोठे संघटन असल्याने रवींद्र सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.

नवी मुंबईत विविध आंदोलने, निदर्शने आदींच्या माध्यमातून कामगार नेते व काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र सावंत यांनी काँग्रेस पक्ष जनसामान्यांमध्ये चर्चेत ठेवण्याचे सातत्याने काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यापासून नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या रवींद्र सावंत यांनी गेल्या काही महिन्यापासून संघटना बांधणीवर विशेष भर दिला आहे. नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या पक्ष संघटनात्मक राजकीय घडामोडी वाढत असल्याने महाविकास आघाडीतील इतर दोन सहकारी पक्षांना व भाजपला त्रासदायकच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

नेरूळमध्ये प्रभाग ८४, ८५, ९६, ९७ या ठिकाणी काँग्रेसकडून नव्याने वॉर्ड अध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून रवींद्र सावंत यांनी नेरूळमध्ये प्रभागा प्रभागात संघटना बांधणीला जोर देताना पक्ष जनताभिमुख करण्याचे पदाधिकार्‍यांना निर्देशही दिले आहेत. राष्ट्रवादीच्या मारूती रामचंद्र माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना काँग्रेसला बळकटी आणणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना रवींद्र सावंत यांची संघटनाबांधणी चर्चेचा विषय बनली आहे. पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी कामगार नेते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, ब्लॉक उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, काँग्रेसचे ओबीसी सेलचे नवी मुंबई अध्यक्ष संतोष सुतार, प्रभाग ९७ चे वॉर्ड अध्यक्ष वामन रंगारी, प्रभाग ९६ चे वॉर्ड अध्यक्ष उत्तम राक्षे, राहुल कापडणे, उत्तम पिसाळ, दिपक गावडे, सुनील जवळ यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मारूती माने यांच्यासमवेत युवकांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने रवींद्र सावंत नेरूळ नोडमध्ये भाजप, महाविकास आघाडीला ऐन महापालिका निवडणुकीत त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आताच निर्माण झाले आहे.

हेही वाचा –

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू