मी सामना वाचत नाही; राज ठाकरेंनी सांगितले कारण

राज ठाकरे यांनी आज मराठी भाषादिनानिमीत्त पनवेल येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक मजेशीर प्रश्नांना उत्तर देत ते सामना का वाचत नाही याबाबत सांगितले. तर वाचनाबाबतचे त्यांचे मत देखील स्पष्ट केले.

संग्रहित छायाचित्र

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी आज (ता. २७ फेब्रुवारी) पनवेल येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तर माझ्या घरात सामना येतो पण मी तो वाचत नाही, असे देखील स्पष्टपणे सांगितले आहे.तर हल्लीची वृत्तपत्रे आणि संपादक यांच्याबाबत देखील त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, वाचन करणे अत्यंत महत्वाचे आहे. माझ्या घरी वृत्तपत्रे येतात. सामना देखील येतो, पण मी तो वाचत नाही कारण हल्लीच्या वृत्तपत्रात तशा बातम्या नसतात, असे सांगत त्यांनी या विषयाला थोडक्यात असे उत्तर दिले. तर प्रबोधनकार सांगायचे पूर्वीचे संपादक हे समाज शहाणा होईल यासाठी लिहायचे. आताचे संपादक हे मी किती शहाणा आहे, हे सांगण्यासाठी लिहितात, असा टोला त्यांनी लागवलेला आहे.

यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कॅफे कॉफी डे यासारख्या कॉफी शॉपने आपल्या शाॅपमध्ये पुस्तके ठेवणे गरजेचे आहे. त्याठिकाणी लोक नुसतेच कॉफी पित इथे तिथे पाहत बसलेले असतात. पण त्याऐवजी पुस्तके वाचणे हे गरजेचे आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात भव्य असे ग्रंथालय उभे करण्यात यावे, ज्याठिकाणी जगभरातील लोक हे ज्ञान घेण्यासाठी येतील, असे मत त्यांच्याकडून यावेळी व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा – मिलिंद नार्वेकर पोहोचले अधिवेशनाच्या सभागृहात; चूक लक्षात येताच दिले स्पष्टीकरण

आपण वाचलं पाहिजे नाहीतर विचारांचा तोकडेपणा येतो. मी मराठी आहे. यापेक्षा मी मराठी बोलणारा माणूस आहे हे कळले पाहिजे. त्यावरुन तुम्ही कोण आहेत हे कळतं असेही राज ठाकरे म्हणाले. तुम्ही मराठी भाषा बोलणारा माणूस आहेत. भाषेने तुम्ही ओळखले जातात. त्यामुळे भाषा ही तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. व्यंगचित्रामुळे माझं वाचन वाढल्याचे यावेळी राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच मला इंदिरा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, ऐतिहासिक लेखन वाचायला आवडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आपल्या पूर्वजांना समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत. शिवरायांचे चरित्र वाचायला आवडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.