घर नवी मुंबई बाप्पा पावला! मोरबे धरणाने काठ गाठला

बाप्पा पावला! मोरबे धरणाने काठ गाठला

Subscribe

जुलै ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मोरबे धरणाने दिलासा देणारी पातळी गाठली आहे. नवी मुंबईकरांची तहान भागविणारे मोरबे धरण आज 8 सप्टेंबरपर्यत 94.58 टक्के भरले आहे.

नवी मुंबई  (ज्ञानेश जाधव) :  यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मोरबे धरणात कमी जलसाठा असल्याने एक दिवसाआड संध्याकाळी नोडनुसार पाणी कपातीची वेळ पालिकेवर आली होती. मात्र जुलै ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मोरबे धरणाने दिलासा देणारी पातळी गाठली आहे. नवी मुंबईकरांची तहान भागविणारे मोरबे धरण आज 8 सप्टेंबरपर्यत 94.58 टक्के भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांवर असणारे जलसंकट पुर्णत: टळले आहे. मोरबे धरणात 312 दिवस म्हणजे 17 जुलै 2024 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. धरणाने यंदा काट गाठला असून बाप्पाच्या आगमनापूर्वी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. (Increase in water storage of Morbe dam)

हेही वाचा – वसईकरांच्या पाण्यासाठी ‘एमएमआरडीए’चा खोडा

- Advertisement -

यंदा हवामान खात्याकडून समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उशिरा आलेल्या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. 18 जुलैपर्यंत मोरबे धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे फक्त 48 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यंदा पावसाने हुलकावणी दिल्यास जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र 20 ते 26 जुलै या दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या सहा दिवसांत तब्बल 81 मीटरने पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारली होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि आता दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावलेल्या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे. मागील वर्षी 8 सप्टेंबर रोजी धरण 85.81 टक्क्यांनी भरले होते. तर यंदा मोरबे धरणात 94.58 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी 2022मध्ये धरण काठोकाठ भरले होते. यंदा गणेशोत्सवापर्यंत असाच पाऊस सुरू राहिल्यास आठवड्याभरात धरण भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मोरबे धरणाची माहिती

ओव्हर फ्लो -: मागील 3 वर्ष म्हणजेच 25 जुलै 2018, 4 ऑगस्ट 2019, 27 सप्टेंबर 2021 रोजी धरण पूर्ण भरले होते. मात्र सन 2020 मध्ये धरण 95 टक्केच भरले होते. यंदा धरणाने तुर्तास तरी काठ गाठला असून आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावल्यास मोरबे धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पाणीसाठा -: शहराला मोरबे धरणातून प्रतिदिन 440 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तर मोरबे धरणाची एकूण पातळी 88 मीटर आहे. धरणाची क्षमता 190.89 दशलक्ष घनमीटर असून 8 सप्टेंबर 2023 पर्यंत 180.559 दशलक्ष घनमीटरवर पोहचली आहे.

पाणी पुरवठा -: नवी मुंबई शहारातील आठ नोडमध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर शहरातील एमआयडीसी नागरी वसाहत, कामोठे व मोरबे परिसरातील सात गावांनाही धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

- Advertisment -