नवी मुंबई-: नवी मुंबईकरांच्या मूलभूत हक्कांसाठी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने ८ ते ९ फेब्रुवारी रोजी ‘क्रांती हक्क मोर्चा‘ आयोजित केला आहे. ( ‘Kranti Haq Morcha’ on behalf of Navi Mumbai District Youth Congress on February 8 to 9) ८ फेब्रुवारीला दिघा येथून निघणारा हा मोर्चा २६ किलो मीटर पायी चालून दुसर्या दिवशी ९ फेब्रुवारीला नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. नवी मुंबईकरांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत या निर्धाराने जनजागृतीपर ‘काही तरी कर नवी मुंबईकर‘ ही लोकचळवळ गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असून क्रांती हक्क मोर्चा नवी मुंबईत परिवर्तन करणारा ठरणार आहे. नवी मुंबईकरांनी यात मोठया संख्येने सहभागी हावे, असे आवाहन युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी केले आहे.
युवक काँग्रेसच्यावतीने या मोचोच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगीमाजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत, युवकचे प्रभारी दीप काकडे, जिल्हा युवक अध्यक्ष संदेश बनसोडे, युवक उपाध्यक्ष भीमराव भोसले, सुनील किंद्रे आणि ऐरोली ब्लॉक अध्यक्ष राजू वानखडे उपस्थित होते.
युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील प्रत्येक कानाकोपर्यात जाऊन नागरिकांना भेडसाविणार्या आरोग्य, शैक्षणिक, पाणी प्रश्न जाणून घेत त्या सोडविण्यासाठी अनेकदा आंंदोलने केली. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर ३३ चौकसभा आणि परिवर्तन सभेच्या माध्यमातून युवक काँग्रेसने ‘काही तरी कर नवी मुंबईकर‘ ही लोकचळवळ उभी केली. मात्र सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी पालिका आयुक्त उदसीन असल्याने ३१ जानेवारी रोजी स्वाक्षरी मोहिम राबवून जनतेच्या प्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु त्यानंतरही कुणाच्या तरी दबावाखाली काम करणार्या आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने अखेरचा पर्याय म्हणून दोन दिवसीय क्रांती हक्क मोर्चाची हाक दिल्याचे, अनिकेत म्हात्रे यांनी सांगितले.
काय आहेत मागण्या
नावाजलेल्या शहरातील ढिसाळ आरोग्यवस्थेचा कारभार सुधारावा, वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये करारानुसार १० टक्के बेडस राखीव करावे,पालिकेने डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचार्यांची रिक्त पदे भरावी, मोरबे व बारवी धरणातून पाणी पुरवठा होत असतानाही नवी मुंबईकरांना मुबलक पाणी मिळत नाही आहे. त्याचे नियोजन करावे, पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुयोग्य शिक्षण आणि शालेय सुविधा तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात, या युवक काँग्रेसच्या मागण्या आहेत.