ऐरोली, दिघा वॉर्डमध्ये कर्मचार्‍यांची वानवा; कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली आणि  दिघा विभागात कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने कामानिमित्ताने आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तर अधिकारी नसल्याने इतर कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा भार देऊन सहाय्यक आयुक्तांना कामकाजांचा गाडा रेटावा लागत आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही आवश्यक असणारा कर्मचार्‍यांचा ताफा देण्यात येत नसल्याची ओरड विभाग कार्यालयात पहावयास मिळत आहे. ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून महेंद्र सप्रे आणि दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून मनोहर गांगुर्डे यांच्याकडे वर्षभरा पुर्वी पदभार देण्यात आला आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली आणि  दिघा विभागात कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने कामानिमित्ताने आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तर अधिकारी नसल्याने इतर कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा भार देऊन सहाय्यक आयुक्तांना कामकाजांचा गाडा रेटावा लागत आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही आवश्यक असणारा कर्मचार्‍यांचा ताफा देण्यात येत नसल्याची ओरड विभाग कार्यालयात पहावयास मिळत आहे.
ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून महेंद्र सप्रे आणि दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून मनोहर गांगुर्डे यांच्याकडे वर्षभरा पुर्वी पदभार देण्यात आला आहे. या दोन्ही विभागात सर्वाधिक लोकसंख्या व झोपडपट्टीचा परिसर येतो. अनेक नागरिक करभरणा, पालिकेच्या विविध योजना, महिला बचत गटाच्या सदस्या, तक्रारदार, लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी समस्यां मांडण्यासाठी विभाग कार्यालयात येतात मात्र अनेकदा संबंधीत विभागाचे कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे मनस्ताप सोसावा लागतो.
पालिकेच्या सेवा सूत्रावलीनुसार विभाग अधीक्षक, वरिष्ठ  करलिपीक, लिपीक, स्वच्छता निरीक्षक आणि अभियांत्रिकी कर्मचारी आवश्यक असतात. परंतु दोन्ही विभाग कार्यालयात अवघ्या ५० टक्के कर्मचार्‍यांचा ताफा कार्यरत असल्याने स्वच्छ भारत अभियान, दैनंदिन पाहणी, नागरिकांच्या समस्या आणि अतिक्रमणाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. वारंवर कर्मचार्‍यांनी मागणी करुनही संगणक, इंटरनेट, प्रिंटर देखील वेळेवर देण्यात आलेे नाहीत. त्यामुळे अनेकदा कर्मचारी स्व:खर्चाने साहित्य आणून काम करत  आहेत.

लिपिकासह ३० कर्मचार्‍यांचा तुटवडा
दिघा विभागात अनुजा पेडणेकर दोन महिने रजेवर, प्राची पाटील पाच महिने गैरहजर, मुकेश बेनवाल सतत गैरहजर तर दिघा विभागातून मासिक वेतन घेणारे उपअभियंता विश्वनाथ लोकरे हे दिघा विभागात नेमणूकीत आहेत  मात्र ते घणसोली विभागात तर वरिष्ठ करनिरीक्षक गणपत पाटील देखील ऐरोली निवड कार्यालयात त्याच प्रमाणे स्वच्छता निरीक्षक गणेश राऊत ऐरोली विभागात कार्यरत  आहेत.त्यामुळे दिघा विभागात कर्मचारी नेमूनही उपलब्ध नसल्याने कामाचा खोळंबा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.तर दिघ्यात लिपिक, वरिष्ठ लिपिक, अभियंता यांच्याकडे दैनंदिन कामकाज सोडून त्यांना  अतिक्रमणाच्या कामाला जुंपण्यात आले आहे.  दिघा विभागात प्रशासन व अतिक्रमण अधीक्षक,स्वच्छता निरीक्षक. उपस्वच्छता निरीक्षक आणि लिपिकासह ३० जणांच्या कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे.

ऐरोलीत ३९ कर्मचार्‍यांची गरज
ऐरोली विभागातही अनेक  ओस अधिकारी पदोन्नतीवर दाखल असून इतर पदासाठी नेमण्यात आलेले कर्मचार्‍यांना इतर कामातही वापरण्यात येत आहे. तर अतिक्रमण पथकातही कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. अनेकदा कार्यालयात अभियंता, पाणी विभागातील कर्मचारी उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ऐरोलीतही ३९ कर्मचार्‍यांची गरज असून त्याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.ऐरोली विभाग कार्यालयाला मागणी काही महिन्यांपासून बिल्डर, भुमाफिया आणि दलालांचा विळखा पडला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सर्वच विभागात विविध आस्थापनात कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. पदस्थापना देण्याच्या अनुषगांने  आढावा घेण्याचे  काम सुरु आहे. पुढील आठवडयात ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर विभागवार रिक्त जागेवर आणि मागणीनुसार कर्मचारी वर्ग प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.
– नितिन नार्वेकर, उपायुक्त-नमुंमपा(प्रशासन)