नवी मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात होताच सर्वांना वेध लागतात ते फळांचा राजा हापूस आंब्याची चव चाखण्याचे. कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसीच्या फळ बाजारात दाखल होतो. मात्र, पावसामुळे मोहोर गळाल्याने यंदाचा हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सतत बदलत्या हवामानाचा परिणाम कोकणातील फळबागांवरही झाला होत आहे. याला हापूस आंब्याचाही अपवाद नाही. कोकणातील बहुतांशी भागात दिवाळीपर्यंत पाऊस होता. त्यामुळे थंडी गायब होती. याचा परिणाम आंब्याला मोहोर येण्यावर झाला आहे. यंदा हापूस आंब्याला मोहोर उशिरा आला आहे. अशातच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने झोडपल्याने आलेला मोहोरही काही प्रमाणात गळाला आहे. परिणामी आंबा उत्पादकांना तिहेरी संकटाला सामोरे जावे लागले. मोहोर आलेल्या कलमांना पुन्हा मोहोर जानेवारी महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हापूस आंब्याची फेब्रुवारीमध्ये वाढणारी आवक उशिराने होईल. एप्रिल अखेरीस कोकणातील विविध भागातून हापूसची आवक बाजारात वाढेल, अशी माहिती व्यापार्यांनी दिली.
हेही वाचा… Tata Vs Maruti Suzuki : टाटाने मोडला मारुती सुझुकीचा 40 वर्षांचा हा रेकॉर्ड
केसरचा भाव वधारला
यंदा हापूस आंब्याचा हंगाम जरी लांबणीवर पडणार असला तरी एपीएमसीच्या बाजारात देवगडच्या वाघोटनमधील शेतकरी शकील मुल्ला यांच्या शेतातील केसर आंबा दाखल झाला आहे. बाजारात दाखल झालेल्या पहिल्या पेटीचे विधीवत पूजन फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे, व्यापारी, शेतकर्यांच्या हस्ते करुन आंबा विक्रीचा श्री गणेश करण्यात आला. पाच डझनच्या केसर आंब्याच्या पहिल्या पेटीला 15 हजारांचा भाव अपेक्षित आहे.
हापूसची चव मार्च अखेरीस
यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात हापूसऐवजी केसरने झाली आहे. लांबणीच्या पावसाचा हापूस आंब्याला फटका बसला असून १५ ते २० मार्चनंतर आंब्याचा हंगाम सुरू होऊन सर्वांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळेल.
– संजय पानसरे, संचालक, फळ बाजार
(Edited by Avinash Chandane)