घर नवी मुंबई सिडकोने घराच्या किमती वाढवल्या; मनसेचे भीक मागा आंदोलन

सिडकोने घराच्या किमती वाढवल्या; मनसेचे भीक मागा आंदोलन

Subscribe

नवी मुंबईः सिडकोने बांधलेल्या उलवे आणि बामण डोंगरी येथील घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेऊन केली होती. मात्र सिडकोने दिलेल्या मुदतीत कोणत्याही हालचाली न केल्याने बुधवार १२ एप्रिल रोजी सीवूड येथे सिडको विरोधात भीक मागा आंदोलन करण्यात आले. सीवूडस ग्रँड सेंट्रल मॉल ते डिमार्ट पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. व्यापार्‍यांकडून भीक मागा आंदोलनातून जमलेला निधी सिडकोला देण्यात येणार असल्याचे मनसेचे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.

यावेळी सिडकोच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत मोर्चेकरांनी सिडकोला भीक द्याल, सिडको बिल्डर चे लागेबांधे… गरिबांच्या घराचे केले वांदे, सिडकोला पडतोय पैशांचा पाऊस…गोरगरिबांच्या घरांची होईल का हौस, गोरगरिबांच्या फक्त आणा भाका..सिडकोसाठी भीक टाका, सिडकोचा अजब कारभार…सर्वसामान्यांना करते बेजार, २५ हजार पगारात ३५ लाखाचे घर…न्याय द्या…सोडतधारकांना न्याय द्या,अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

- Advertisement -

सिडकोने दिवाळी २०२२ मध्ये उलवे, बामणडोंगरी या ठिकाणांसाठी ७ हजार ८४९ घरांची अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी महागृहनिर्माण योजने अंतर्गत सोडत काढली होती. ही सोडत काढताना सोडतधारकांसाठी उत्पन्न मर्यादा मासिक कमाल २५ हजारा पर्यंत आणि वार्षिक ३ लाखांपर्यंत सिडकोने ठेवली होती. ही सोडत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत व अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असतानादेखील सिडकोने या घरांच्या किंमती ३५ लाखांच्या घरात ठेवल्या आहेत.

तसेच ही योजना आणताना सिडकोने ३२२ चौ.फूट क्षेत्रफळ मिळेल असे माहिती पुस्तिकेत सांगितले असताना देखील प्रत्यक्षात मात्र योजनेतील घरे ही २९० चौ फूट क्षेत्रफळाची असल्याचा आरोप सोडतीतील धारकांनी केला होता. याबाबत मनसे शिष्टमंडळाने सोडत धारकांसोबत सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेऊन निर्णयासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र निर्णय न झाल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जाणार
सिडकोने उलवे, बामणडोंगरीतील गृह प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न पुर्ण करण्या ऐवजी वार्‍यावर सोडले आहे.या विषयी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यामातून नागरिकांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.

- Advertisment -