मुलांवरील उपचारांसाठी महापालिकेची टास्क फोर्स सज्ज

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रभाव मुलांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने पूर्वतयारी सुरु केलेली असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच ९ मे रोजी नवी मुंबईतील बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद साधला होता.

Navi Mumbai Municipal Corporation will procure 4 lakh corona vaccines through global tender
नवी मुंबई मनपा
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रभाव मुलांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने पूर्वतयारी सुरु केलेली असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच ९ मे रोजी नवी मुंबईतील बालरोग तज्ज्ञांशी वेबसंवाद साधला होता. याबाबतच्या नियोजनाला कृतिशील स्वरुप देण्यासाठी आयुक्तांनी रविवारी विशेष बैठक आयोजित करत महाराष्ट्र शासनाच्या बालरोगतज्ज्ञ कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि नवी मुंबईतील नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले तसेच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईचे शाखा अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे, सचिव डॉ. सतिश शहाणे, खजिनदार डॉ. मेधाई सिन्हा, पालिका बालरोगतज्ज्ञ फोर्सचे सदस्य डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. धनवंती घाडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. उद्धव खिल्लारे व डॉ. माधवी इंगळे उपस्थित होते.
कोविडच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाल्यानंतर मुलांच्या आरोग्याविषयी अधिक जागरुकता बाळगण्याची गरज वर्तविण्यात येऊ लागली. पालकांना आपल्या मुलांबाबत अधिक काळजी वाटत असल्याने हा मुद्दा अत्यंत महत्वाचा झाला. याबाबत पालिकेने नियोजनास सुरुवात केली असून मुलांसाठी कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच आवश्यकतेनुसार त्याठिकाणी बालकांसाठी पूरक व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
या बैठकीत डॉ. विजय येवले यांनी नवी मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणत्या स्वरुपाचे किती बेड्स आवश्यक आहेत. त्यासाठी किती मनुष्यबळ गरजेचे आहे. तसेच कोणत्या स्वरुपाचा औषध साठा उपलब्ध करून ठेवायचा, याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बालकांसाठी सुविधा निर्माण करताना कोविडबाधीत, नॉन कोविड व नवजात बालके अशा तीन स्वरुपाच्या सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करावा लागेल, असे मत मांडण्यात आले.
त्याचप्रमाणे बालकांसाठी आवश्यक विशिष्ट प्रकारच्या टेस्ट्सची व्यवस्था करावी लागेल, असेही सूचित करण्यात आले. एकूण बेड्समध्ये ५० टक्के ऑक्सिजन बेड्स व १५ टक्के बालकांसाठी पूरक आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स व्यवस्था असावी, अशी सूचना करण्यात आली. या सर्व सूचनांबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवित वर्तविलेल्या अपेक्षेपेक्षा अधिकचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासित केले. कोविड सेंटरमध्ये मुले उपचारार्थ दाखल झाल्यानंतर त्यांच्या सोबत काळजी घेण्यासाठी असलेल्या आई अथवा वडिल यांचीही काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन तशाप्रकारची सुविधा निर्माण करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुलांसोबत असलेल्या केअर टेकर यांच्यासाठी एसओपी बनविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. मुलांसाठी कोविड सुविधा केंद्रे बनविताना नॉन कोविड मुलांसाठीही उपचार केंद्रे असावीत या बालरोगतज्ज्ञांच्या सुचनेच्या अनुषंगाने आयुक्तांनी तशाप्रकारची सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय सध्या कोरोनातून बरे झालेल्या मुलांमध्ये एमआयएस – सी आजाराची लक्षणे आढळत असून यावरही चर्चा करण्यात आली. जास्त प्रमाणात ताप, उलट्या, जुलाब, डोळे लाल होणे, ओठ – जीभ – घसा लाल होणे अशी लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास विनाविलंब डॉक्टरांकडे जावे याबाबत पालकांमध्ये जागृती करावी असे बालरोगतज्ज्ञांनी सूचित केले. पालिका मुलांना कोविडची लागण होऊ नये, याकरता दक्ष असून कोविडची बाधा झालीच तर आरोग्य सुविधा वाढीप्रमाणेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहे. याबाबत बालरोगतज्ज्ञांनी सूचविलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –