घरनवी मुंबईपालिकेच्या मालकीचे मोरबे धरण; तरीही कपातीचे धोरण

पालिकेच्या मालकीचे मोरबे धरण; तरीही कपातीचे धोरण

Subscribe

नवी मुंबई : नवी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या मालकीचे धरण असताना सुध्दा आता पाणी कपातीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने पाऊस लांबणीवर पडणार असल्याचे संकेत दिल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने धरणातील जलसाठयानुसार नियोजन केले आहे. त्यानुसार नवी मुंबईत विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) पाणीकपात सुरु केली असून यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पालिकेच्या मोरबे धरणा बरोबरच एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मोरबे धरणात ३८.९४ टक्के ९ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस लांबणीवर जाण्याचा अंदाज तसेच पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संभाव्य पाणी टंचाई निवारण्याकरीता विशेष कृती आराखडा तयार करण्यासाठी पालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालिकेने शहरात पाणी पुरवठ्याची गरज लक्षात घेता मोरबे धरणातील उपलब्ध पाणी साठ्यातून पुरवठा नियोजन करण्यासाठी पालिका क्षेत्रात मध्ये विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेत आजपासून अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सोमवारी बेलापूर, मंगळवारी कोपरखैरणे, बुधवारी घणसोली, गुरुवारी वाशी, शुक्रवारी ऐरोली, शनिवारी नेरुळ आणि रविवारी तुर्भे विभागात संध्याकाळी पाणी येणार नाही.

- Advertisement -

दिघा विभागाचे नियोजन एमआयडीसीकडे
दिघा विभागाला नवी मुंबई महानगरपालिकेऐवजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे दिघा क्षेत्रात एमआयडीसीच्या नियोजनानुसार पाणी पुरवठा आणि शटडाऊनचे नियोजन करण्यात येणार आहे.

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशनुसार पाणी नियोजनाच्या अनुषंगाने नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सात विभागात आठवडयातून एक दिवस संध्याकाळी पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी जलसंकट लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन नवीमुंबई मनपा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -