घरनवी मुंबईपावसाळा कालावधीत समन्वय राखण्याचे आयुक्तांचे निर्देश

पावसाळा कालावधीत समन्वय राखण्याचे आयुक्तांचे निर्देश

Subscribe

नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून यावेळी नवी मुंबईत उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने ज्या भागात अडचणी जाणवल्या त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून यावेळी नवी मुंबईत उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने ज्या भागात अडचणी जाणवल्या त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. कार्यकारी अभियंता यांनी कामकाजाचा अर्धा दिवस आपल्या कार्यक्षेत्रात कामांचे पाहणी दौरे करावेत तसेच पावसाळा कालावधीतही विशेषत्वाने मोठी भरती असणा-या व त्यावेळी पाऊस पडत असलेल्या दिवशी कार्यक्षेत्रात अधिक दक्ष रहावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या.

शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून वेब संवादाव्दारे आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार तसेच सर्व विभागप्रमुख, नोडल अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाहतुक पोलीस, एमएमआरडीए, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, एमटीएनएल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, सुरक्षा व आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे प्रबंधक, एपीएमसी मार्केट, महावितरण, रॅपिड ॲक्शन फोर्स, बीईएसटी, नागरी संरक्षण दल, टीबीआयए, स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो., केमिकल ॲण्ड अल्कली इंटस्ट्रीयल सोसा., मच्छिमार संघटना यांचे मुख्य अधिकारी, पदाधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisement -

विविध प्राधिकरणांच्या अधिकारी वर्गाशी संवाद साधताना सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीपूर्वी करावयाची कामे विहीत वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. यापुढील काळात रस्ते खोदले जाणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घेऊन चरांची पुर्नस्थापना २५ मे पर्यंत पूर्ण करावी तसेच पावसाळा कालावधीत अत्यावश्यक काम दाखवून रस्ते खोदले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विद्युत महामंडळाला अत्यावश्यक कारणासाठी जरी रस्ता खोदावा लागला तरी त्यासाठी संबंधित विभाग कार्यालयास कळवनूच खोदकाम करावे असे आयुक्तांनी सूचित केले. वाहतुक पोलीस उप आयुक्तांच्या सूचनेनुसार लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, ब्लिंकर्स लावणे, सिग्नल कार्यान्वित ठेवणे याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.

यापूर्वीच्या दोन्ही बैठकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत रस्त्यात खड्डा दिसणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले होते. त्यावर पुन्हा भाष्य करीत रस्त्यांवर पडणा-या खड्ड्यांची जबाबदारी संबंधित अभियंत्यांवर निश्चित करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक पथदिव्यांच्या खांबांची पाहणी करावी असे निर्देश विद्युत विभागाला देत त्यासोबतच सिग्नल्सचीही पाहणी करून काळजी घेण्याचे आदेशीत करण्यात आले. नाले सफाई व गटारे सफाई या कामांना गती द्यावी तसेच नुकत्याच झालेल्या पावसात निदर्शनास आलेल्या पाणी साचण्याच्या ठिकाणांची पाहणी करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्या.

- Advertisement -

पावसाळा कालावधीत होल्डींग पॉंडवर असणा-या फ्लॅप गेटची उपयुक्तता अत्यंत महत्वाची असून सर्व फ्लॅप गेट बदली अथवा दुरुस्तीची कार्यवाही २५ मे पर्यंत पूर्ण करावी असे आदेशीत करतानाच फ्लॅप गेट कार्यान्वित राहतील याचे निरीक्षण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित ठेवावी असे आयुक्तांनी सांगितले. होल्डींग पॉंडवर असणारी पंपीग स्टेशन पावसाळा कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सुरु ठेवण्यात अडथळा येतो हे लक्षात घेऊन ३ ते ४ दिवसाचा बॅकअप ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासोबतच महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांनाही येथील विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.

बैठकीच्या सुरुवातीस विविध प्राधिकरणांची परस्परांशी निगडीत असलेली पावसाळापूर्व कामे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्याबाबत तत्परतेने कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. प्रत्येक प्राधिकरणाने नोडल अधिकारी नेमून त्याचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत तसेच त्या अधिका-याशी संपर्क होऊ शकला नाही तर इतर २ अधिका-यांचे संपर्कध्वनी द्यावेत असे सूचित करण्यात आले. एमआयडीसी भागातील रस्ते, गटारे याबाबत जलद कार्यवाही करण्यात यावी असे सांगत ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन यांचेमार्फत सूचित कामांबाबत एमआयडीसी आणि महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने समन्वय राखून तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

यासोबतच रात्र निवारा केंद्र दुरुस्ती, संक्रमण शिबिरांची सुविधा, आवश्यक अन्नधान्य साठा नियोजन व त्याची योग्य रितीने जपणूक, धोकादायक इमारत यादी प्रसिध्दी, भूस्खलनाच्या संभाव्य जागा, क्वारी तसेच नाल्यांशेजारी असणा-या झोपड्यांचे स्थलांतरण, पाणी साचण्याच्या संभाव्य जागांवर पुरेशा पम्पसची व्यवस्था याही बाबींकडे बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनात उपयोगी साहित्य सामुग्री वापरात आणण्याच्या दृष्टीने त्याची तपासणी व मॉक ड्रिल करण्याच्या सूचना अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागास देण्यात आल्या.

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी खड्डयांमध्ये पाणी साचून दुर्घटना होणार नाही अथवा डासांची पैदास होणार नाही याकरिता अशा बांधकाम साईट्सवर नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी लक्ष ठेवावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जलकुंभाच्या सुरक्षिततेबाबतही संपूर्ण काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या. ज्या सोसायट्यांनी छतावर पत्र्याचे शेड बनविलेले आहेत त्यांचे पत्रे पावसाळी कालावधीत जोरदार वा-यामुळे उडून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सोसायट्यांनी ते दुरुस्त करून घेण्याच्या सूचना विभाग अधिका-यांमार्फत देण्यात याव्यात असे सूचित करण्यात आले.

कोणतीही आपत्ती सांगून येत नाही तथापि त्यादृष्टीने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी असे सूचित करण्यात आले. आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रत्येक विभाग कार्यालयात मदत केंद्रे स्थापित करण्यात येत असून सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये २५ मे पासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अडचणींसाठी महापालिका मुख्यालयातील ३६५ दिवस २४ x ७ कार्यरत असणा-या मध्यवर्ती आपत्ती निवारण केंद्राशी १८००२२२३०९ व १८००२२२२३१० या टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा –

कोरोनात प्रतिकार शक्ती वाढवणारी पपई झाली महाग! पपईचे गुणधर्म ‘या’ ४ फळांमध्येही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -