नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या चार महिन्यात म्हणजेच साधारणतः एप्रिल महिन्यात विमानसेवा सुरळीतपणे सुरू होणार आहे. त्यामुळे 17 एप्रिलपासून या विमानतळावरून प्रवासी व मालवाहतुकीसाठीची उड्डाणे सुरू करण्याचा निर्धार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. रविवारी (ता. 29 डिसेंबर) या विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आले. इंडिगो A320 प्रवासी विमान 01 वाजून 38 मिनिटांनी लॅंड झाले आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला. त्यामुळे आता नवी मुंबईतील हे विमानतळ चालू होण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. परंतु, या विमानतळाचा सर्वाधिक फायदा हा पुणेकरांना होणार आहे. कारण या विमानतळामुळे पुणेकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. (Navi Mumbai International Airport is the most beneficial for Pune residents)
पुणेकर सध्या विमान प्रवास करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करतात. परंतु, पुण्यावरून मुंबईला येण्याकरिता साधारणतः 3.30-4 तासांचा वेळ लागतो. मात्र, पुणे ते नवी मुंबई हा प्रवास केवळ 02 तास 20 मिनिटांमध्ये पार करता येते. त्यातही एक्सप्रेस वेवरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे तर आणखीच सोपे आहे. या विमानतळामुळे पुणेकरांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे. याचमुळे पुणेकरांच्या वेळेची बचत तर होणारच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांना प्रवासही कमी करावा लागणार आहे. असे नाही की पुण्यात विमानतळ नाही. पुणेकरांसाठी लोहगाव विमानतळ आहे, जे सर्वात जवळ आहे. पण या ठिकाणाहून मर्यादित विमानसेवा असल्याने याचा फारशा पुणेकरांना फायदा होत नाही.
हेही वाचा… Maharashtra Weather : नववर्षाचे स्वागत गुलाबी थंडीने होणार, 24 तासांत तपमानाचा पारा घटणार
लोहगाव विमानतळावरून फक्त दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या तीन ठिकाणीच आंतरराष्ट्रीय विमानं उड्डाण घेतात. यासंदर्भात हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वांदेकर यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देत म्हटले की, पुण्यातल्या लोहगाव विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मर्यादा आहेत. तिथल्या धावपट्ट्या कमी आहेत. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेत तिथून विमान उड्डाणं होत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांसाठी प्रवाशांना हैदराबाद, बंगळुरू किंवा दिल्लीला जावे लागते. बाणेरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला तर जेवढा वेळ लोहगाव विमानतळावर जायला लागेल, तेवढाच किंवा त्यापेक्षा किंचित जास्त वेळात ती व्यक्ती थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचेल.
तर, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो विमानांसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उद्योग-व्यावसायिकांसाठीही वेगळे पर्याय शोधणे आवश्यक ठरते. पण नवी मुंबई विमानतळामुळे ही अडचण दूर होऊ शकते. नाशिवंत मालाची आयात-निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी मुंबई विमानतळ हा चांगला पर्याय ठरू शकतो. पुण्याजवळच्या चाकण व तळेगावमधील उद्योगांसाठी नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्याचा कमी वेळ महत्त्वाचा ठरू शकतो.