Homeनवी मुंबईNavi Mumbai News : स्वच्छतेसाठी 6 हजार नवी मुंबईकर धावले, सुजाता माने...

Navi Mumbai News : स्वच्छतेसाठी 6 हजार नवी मुंबईकर धावले, सुजाता माने आणि अक्षय पडवळ विजयी

Subscribe

नवी मुंबई : स्वच्छतेबाबत नवी मुंबई अव्वल आहे. तरीही नवी मुंबईचे स्वच्छतेबाबत मानांकन उंचावण्यासाठी ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’चे रविवारी (22 डिसेंबर) आयोजन करण्यात आले होते. या हाफ मॅरेथॉनमध्ये तब्बल सहा हजार नवी मुंबईकर धावले. ध्येय एकच नवी मुंबई स्वच्छ करण्याचे. विशेष म्हणजे ही हाफ मॅरेथॉन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पूर्ण केली. तसेच महाराष्ट्र पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्णप्रकाश यांनीही हाफ मॅरेथॉन पूर्ण करून स्वच्छता आणि फिटनेसचा संदेश दिला.

- Advertisement -

नवी मुंबईतील पामबीच मार्गावर या हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पहाटे साडेपाच वाजता 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. त्यावेळी नवी मुंबईकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यात नवी मुंबईकरांसोबत आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि फोर्सवनचे प्रमुख कृष्णप्रकाश यांनी धावपटू म्हणून सहभागी होत नवी मुंबईकरांना साथ दिली. त्याचवेळी सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांनी हाफ मॅरेथान तर प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी 10 किलोमीटर धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शरद आरदवाड आणि इतरही विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी 5 किलोमीटरच्या गटात सहभागी झाले होते.

हेही वाचा…  Raigad News : अन् अलिबाग ते रेवदंडा रस्ता चकाचक झाला, 68 किलोमीटरच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता

- Advertisement -

स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉ़न उपक्रम यशस्वी केल्याबद्दल आणि नवी मुंबईच्या ओळखीप्रमाणेच आरोग्यपूर्ण शहर हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आयोजित केलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल नवी मुंबईकरांचे आयुक्त कैलास शिंदे यांनी आभार मानले. त्यावेळी त्यांनी दिव्यांगांचे कौतुक केले आहे. आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करत मॅरेथॉनमध्ये सहभागी होत दिव्यांगांनी सर्वांनी प्रेरणा दिल्याचे आयुक्त म्हणाले. 21 किमी, 10 किमी. आणि 5 किलोमीटर गटाप्रमाणेच या हाफ मॅरेथॉनमध्ये 1 ते 3 किलोमीटरच्या विशेष रनमध्ये दीडशेहून अधिक तृतीयपंथी, 50 हून अधिक दिव्यांग, 40 हून अधिक ऑटिझम व्यक्ती, 50 हून अधिक अंध व्यक्ती यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय अनेक दिव्यांग 5 किलोमीटरच्या रनमध्ये सहभागी झाले होते. तसेच काही अंध व्यक्तींनी 10 व 21 किलोमीटरच्या गटात सहभाग घेतला होता. शिवाय 500 हून अधिक शालेय विद्यार्थी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

मॅरेथॉनचे विजेते

अक्षय पडवळ यांनी 21 किलोमीटरचे अंतर 1 तास 13 मिनिटे आणि 54 सेकंदात पूर्ण करून पुरुष गटातील विजेतेपद पटकावले. तर सुजाता माने यांनी 2 तास 4 मिनिटे आणि 12 सेकंदात हे अंतर पूर्ण करून महिला गटाचे विजेतेपद मिळवले. 10 किलोमीटरमध्ये ओंकार बैकर यांनी पुरुष गटात आणि कोमल खांडेकर यांनी महिला गटात विजेतेपद पटकावले. या शिवाय 18 ते 35 तसेच 36 ते 45 पुढे 46 ते 54 आणि 55 पुढील अशा चार वयोगटांमध्ये पुरुष आणि महिला गटांमध्ये प्रत्येक गटात 3 पारितोषिके प्रदान करण्यात आली.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -