पनवेल : नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस (29 डिसेंबर 2024) ऐतिहासिक म्हणावा लागेल. ग्रीन फिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले प्रवासी विमान उतरले. इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान बरोब्बर 1 वाजून 38 मिनिटांनी लॅंड झाले आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला. याच जल्लोषात हे विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात आली. 17 एप्रिल 2025 रोजी या विमानतळावरून पहिलं टेक ऑफ केले जाईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11 ऑक्टोबर 2024 रोजी हवाईदलाचे सी-295 आणि सुखोई या दोन विमानाचे लँडिंग करून यशस्वी चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर मार्च 2025 पासून विमानतळ सुरू होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, आजच्या प्रवासी विमानाच्या लॅंडिंगनंतर 17 एप्रिलपासून देशांतर्गत आणि मालवाहतूक सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
12 डिसेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांनी दक्षिण धावपट्टी 8/26 वर फ्लाईट कॅलिब्रेशन करून पीएपीआयची यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर प्रवासी विमान उतरवण्याचा निर्णय झाला होता. ही चाचणीही यशस्वी झाल्यामुळे विमानतळ कर्मचारी, सिडकोचे अधिकारी यांनी विमानाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यानंतर विमानाला वॉटर सॅल्यूट करण्यात आले आणि विधिवत पूजादेखील करण्यात आली.
लाखभर रोजगार
नवी मुंबई विमानतळाच्या कामामुळे नवी मुंबईमधील एक लाखापेक्षा जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रकल्पग्रस्तानादेखील रोजगार मिळणार आहे. तसेच विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रात पाठवलेला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
– विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
(Edited by Avinash Chandane)