Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई नवी मुंबईकरांनो अस्वच्छतेच्या सवयी बदला

नवी मुंबईकरांनो अस्वच्छतेच्या सवयी बदला

महापालिकेचे स्वच्छतेचे 21 दिवस चॅलेंज

Related Story

- Advertisement -

एखादी गोष्टीची सवय लागण्याकरता ती गोष्ट सतत 21 दिवस करीत रहायला पाहिजे असे मानले जाते. 21 दिवसांनंतर ती गोष्ट करण्याची आपल्या शरीराला आणि मेंदूला सवय लागते. नेमका हाच धागा पकडून नवी मुंबईकर नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी याकरता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021′ च्या अनुषंगाने स्वच्छतेचे ’21 दिवस चॅलेंज’ हा स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.

19 फेब्रुवारी ते 11 मार्च 2021 या 21 दिवसांच्या कालावधीत हा उपक्रम राबविला जात असून यामध्ये नागरिकांनी स्वच्छतेसंबंधी पाच कृती दररोज नियमितपणे करून त्याची छायाचित्रे नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवर तसेच इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करावयाची आहेत. दररोज करावयाच्या 5 कृतींमध्ये कच-याचे ओला, सुका आणि घरगुती घातक अशा 3 प्रकारे कचरा निर्माण होतो. त्याच ठिकाणाहून घरापासूनच वर्गीकरण करणे, कम्पोस्ट बास्केट वापरून घरातच ओल्या कच-याचे खतात रूपांतर करणे, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा कमी करणे, कचरा पुनर्उपयोगात आणणे, कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे या ‘थ्री आर’ नुसार कार्यप्रणाली राबविणे, शहर सुशोभिकरणांतर्गत विविध ठिकाणी चितारलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ लोगोसोबत सेल्फी काढणे अशा 5 कृती करावयाच्या आहेत.
या पाच कृती दररोज 21 दिवस करून त्याची छायाचित्रे नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर दररोज अपलोड करावयाची आहेत. छायाचित्रे अपलोड करताना त्यासोब हॅशटॅग टाकायचे आहेत. या 5 कृतींपैकी दररोज योग्य कृती आणि त्याचे छायाचित्र अपलोड केल्यानंतर प्रत्येक कृतीला 20 याप्रमाणे 100 गुण दिले जाणार आहेत. शिवाय काही बोनस कृती कार्यही सहभागी स्पर्धकांना आठवड्याभराच्या कालावधीत दिले जाईल.

- Advertisement -

या 21 दिवसांच्या स्वच्छता चॅलेंज मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या नागरिकास ‘आय फोन 12 मिनी’ हा मोबाईल फोन बक्षिस स्वरूपात दिला जाणार असून याशिवाय 20 हून अधिक इतरही आकर्षक पारितोषिके सुप्रसिध्द गायक, संगीतकार आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रॅंड अॅम्बॅसेडर शंकर महादेवन यांच्या हस्ते ‘ म्युझिकल नाईट’ मध्ये देण्यात येणार आहेत. आपले शहर स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यामध्ये प्रत्येक नागरिकाचे योगदान असावे व स्वच्छता ही नियमित सवय व्हावी यादृष्टीने 21 दिवसांच्या या स्वच्छता चॅलेंजमध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा व स्वच्छतेचे आव्हान स्वीकारून आकर्षक पारितोषिकांचे मानकरी व्हावे आणि स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून आपला सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्तअभिजीत बांगर यांनी केले आहे.

- Advertisement -