नवी मुंबईत ५२४ इमारती धोकादायक; यंदा दहा इमारतींची वाढ

संग्रहित छायाचित्र

नवी मुंबईः नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहिर केली आहे. पालिकेने प्रभागनिहाय सर्वेक्षण करुन ही यादी घोषित केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६५ अन्वये एकूण ५२४ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी महापालिकेने ५१४ इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. यंदा धोकादायक इमारतींच्या संख्येत १० ने वाढ झाली आहे. पालिकेने या इमारतीत राहणार्‍या नागरिकांना धोकादायक इमारतीत न राहण्याचे आवाहन केले आहे.

यामध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१’ प्रवर्गामध्ये मोडणार्‍या ६१ इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गातील ११४ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गाच्या ३०० इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरूस्ती या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये ४९ इमारती अशाप्रकारे एकूण ५२४ धोकादायक इमारतींची घोषित करण्यात आल्या आहेत.

धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ’विभाग’ सेक्शनमध्ये ’अतिक्रमण विभाग’ माहितीच्या सेक्शनमध्ये अवलोकनासाठी उपलब्ध आहे. पावसाळा कालावधीत धोकादायक इमारत किंवा घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी याचा वापर तात्काळ थांबवा,असे आवाहन पालिकेने केले आहे. अन्यथा दुर्देवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घ्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंतचा आढावा
सन        इमारत संख्या
२०१९        ४४३
२०२०        ४५७
२०२१        ४७५
२०२२        ५१४