नवी मुंबई : महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांना देण्यात येणार्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. बाहयरुग्ण (ओपीडी) रुग्णांसाठी आरोग्य विषयक सुविधांची माहिती घेतली. उपचारासाठी येणार्या रुग्णांचा केसपेपर काढण्यापासून ते आंतररुग्ण (आयपीडी) सेवा घेऊन तो बरा होऊन परत जाईपर्यंतच्या कार्यालयीन नोंदी डिजीटल स्वरुपात घेतल्या जाव्यात यादृष्टीने एचएमआयएस (हॉस्पिटल मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टीम) प्रणाली अद्ययावत करणे आणि पेपरलेस कामकाज सुरु करण्याचेही निर्देश आयुक्त शिंदे यांनी दिले.
रुग्णालयातील बाहयरुग्ण कक्ष, क्ष-किरण, सोनोग्राफी व सिटी स्कॅन कक्ष, पॅथोलॉजी, औषध वितरण कक्ष, अपघात विभाग, आपत्ती कक्ष, रक्तपेढी, आयसीयू, डायलिसीस, एनआयसीयू, प्रसूतीपूर्व कक्ष, शल्यचिकित्सा कक्ष, मेडिकल वॉर्ड, बालरोग विभाग, थॅलेसेमिया काळजी कक्ष, अस्थिव्यंग कक्ष, प्रसूती पश्चात कक्ष, औषध भांडार विभाग, मेडिकल रेकॉर्ड विभाग अशा विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करीता आयुक्तांनी तेथील सुधारणांविषयी सूचना केल्या. नवजात बाळांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने दुध बँक सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
हेही वाचा… Sainik Schools : मोदी सरकारच्या धोरणाबद्दलच प्रश्नचिन्ह, सुप्रिया सुळे यांचा भाजपावर निशाणा
औषध भांडार विभागाची पाहणी करताना तेथील औषधे आवक-जावक पध्दती त्यांनी जाणून घेतली. सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणच्या औषध साठयावर केंद्रीय नियंत्रण राहावे व त्या अनुषंगाने औषध खरेदी प्रणाली विकसीत करावी आणि हे सर्व कामकाज ऑनलाईन असावे या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अशाच प्रकारे रूग्णालयाच्या मेडिकल रेकॉर्ड विभागाचेही संपूर्ण डिजीटलायजेशन करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
हेही वाचा…Lok Sabha 2024 : कल्याणमध्ये ठाकरे गटाची खेळी; श्रीकांत शिंदेंविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर कोण?
याप्रसंगी त्यांच्यासमवेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त योगेश कडुसकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रविंद्र म्हात्रे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय गडदे, वाशीचे विभाग अधिकारी सागर मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.