सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांची नीरा भागवतेयं तहान

एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाचा पारा चढल्याने नागरिकांनी शीतपेयांचा आधार घेतला आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबू पाणी, नारळ पाणी, ऊसाचा रस, ताक या शीतपेयांची मागणी वाढली आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाचा पारा चढल्याने नागरिकांनी शीतपेयांचा आधार घेतला आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबू पाणी, नारळ पाणी, ऊसाचा रस, ताक या शीतपेयांची मागणी वाढली आहे. या शीतपेयांबरोबरच सायन-पनवेल महार्गावरील वाशी ते खारघर-पनवेल महामार्गावर बाहेर जाणार्‍या वाहन चालकांची नीरा पिण्यासाठी गर्दी वाढत आहे. उन्हासोबत तापलेल्या रस्त्याचे चटके बसत असल्याने हैराण झालेल्या नागरिकांची सध्या सुमधूर नीरा तहान भागवत आहे.
नारळाच्या पाण्यासोबत नीरा हे पेय देखील निसर्गाचा चमत्कार समजला जातो.

ताड, माड, खजुरी, शिंदी या झाडांमधून पाझरणारा नीरा पोषक आणि उपायकारक आहे. नीरा म्हणजे अनेकांना ही ताडी अथवा माडी म्हणजे नशा आणणारे पेय वाटते. त्यामुळे नव्याने पिणारे अनेकजण काहीसे संशयानेच त्याकडे पाहतात. मात्र एकदा मधुर निरेचा घोट पोटात गेला की नाही म्हणणारा ग्राहक हक्काने दोन ग्लास जादा पितो इतके हे पेय लज्जतदार आणि शरीराला तजेला देणारे आहे.

कोकणात हे पेय जास्त प्रमाणात आढळते. सर्वत्र शीतपेय, सरबत, लस्सी, ताक यासारखे तहान भागविण्याचे अनेक पर्याय सहज उपलब्ध होऊ लागल्याने काळाच्या ओघात या केंद्रांची संख्या मात्र खूपच कमी होत गेली होती. मात्र सायन-पनवेल या महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गावर शासनाने नीरा विक्री करण्यास दिलेल्या मुभेमुळे या नीरा विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

नामांकित कंपन्यांची आपला उद्योग वाढविण्यासाठी छोट्या- छोट्या पॅकिंगमध्ये शीतपेयांची वाढीव किमतीने विक्री सुरू आहे. परंतु मूळ निसर्गाची आरोग्यवर्धक देणं असलेल्या नीराची विक्री कोणत्याही पॅकेटमधून केली जात नाही. अवघ्या १० रुपयात नीरा तहान भागवत आहे. भारतात विशेषत: महाराष्ट्रातील कोकणाची ओळख असलेल्या नीरा देखील सरकारने अनुदान देऊन हा पारंपरिक व्यवसाय करणार्‍यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे, असे मत नीरा विक्रेत्या आशाताई कुरणे यांनी व्यक्त केले.