Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार; आंदोलकांचा इशारा

अन्यथा विमानतळाचे सर्व कामे बंद पाडणार; आंदोलकांचा इशारा

स्वातंत्र्यदिनापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अन्यथा विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने आंदोलकांच्या साक्षीने सरकारला देण्यात आला.

Related Story

- Advertisement -

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अन्यथा दुसऱ्या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने गुरुवारी लाखो आंदोलकांच्या साक्षीने सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला.

दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिलेच पाहिजे, या मागणीसाठी बेलापूर येथे सिडकोवर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व जाती धर्माचे समाज, विविध राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त नागरिक आंदोलनकर्त्यांनी सहभागी घेऊन ‘जय दिबा’ असा एल्गार केला. ‘फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा होईल, असा खणखणीत आवाजही दिला. यावेळी दिबासाहेबांच्या जयकाराच्या गगनभेदी घोषणा देत संपूर्ण आसमंत दणाणून सोडला होता.

- Advertisement -

ही मागणी २००८ सालापासून होत आहे. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी व भूमिपुत्र जनतेच्या भावना जाणून न घेता मागणी केली आणि कोरोनाची भयावह परिस्थिती असतानाही विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने धिसाडघाईने केला. त्यामुळे नामकरणाचा वाद निर्माण झाला आणि तो चिघळलाही. या प्रकल्पाला दि. बा पाटील असे नामकरण करण्याचा आग्रह भूमिपुत्रांनी स्थानिकांनी धरला आहे. ठाकरे सरकारने हेकेगिरी केल्याने भूमिपुत्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद या आंदोलनात दिसून आले.

- Advertisement -

अनेकांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेचा निषेधही यावेळी व्यक्त केला. कुठलाही विचार न करता मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता आपलाच हट्ट पुढे केला. त्यावेळी झालेल्या बैठकीतून एकदा उठूनही गेले. काहीही झाले तरी ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला. कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने २४ जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला होता आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन लाखो आंदोलकांच्या सहभागाने झाले. दरम्यान शिष्टमंडळाने सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण संदर्भात केलेला ठराव रद्द करावा आणि दि. बा. पाटील यांच्या नावाने नवीन ठराव करावा अशा प्रकारची मागणी शिष्टमंडळाने सिडकोकडे केली.

या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार व माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पनवेल महानगरपालिकेचे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, विविध पक्ष, संघटना, वारकरी सांप्रदाय, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे, शहापूर, नाशिक, कल्याण, डोंबिवली आदी भागातून लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा –

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दोन्ही मुलांवर गोळीबार

- Advertisement -