…अन्यथा पुन्हा लॉकडाऊन

नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी भाजीपाला व फळ मार्केट याठिकाणी अचानक भेट दिली. यावेळी त्यांना बहुतांशी नागरिकांकडे मास्क आहेत मात्र अनेकांनी ते त्यांनी नाक व तोंडावर न लावता हनुवटीवर लावले असल्याचे निदर्शनास आले.

Navi Mumbai

नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढलेली दिसत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. त्यानुसार मंगळवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोव्हीड प्रादुर्भावाकरीता सर्वाधिक जोखमीचे क्षेत्र असणा-या ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन त्याठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक सुरक्षा नियमांचे कशा रितीने पालन होते. याबाबतच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

ए.पी.एम.सी. मार्केट परिसरातील भाजीपाला, फळे, धान्य, मसाला, कांदाबटाटा अशी पाचही मार्केट पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तिन्ही पाळ्यांमध्ये सुरु रहात असून त्याठिकाणी इतर शहरांमधून दररोज 50 ते 60 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापारी, शेतकरी, आडतेदार, ग्राहक ये-जा करीत असतात. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर संभवतो. या अनुषंगाने आयुक्तांनी भाजीपाला व फळ मार्केट याठिकाणी अचानक भेट दिली. यावेळी त्यांना बहुतांशी नागरिकांकडे मास्क आहेत मात्र अनेकांनी ते त्यांनी नाक व तोंडावर न लावता हनुवटीवर लावले असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे तेथे सुरक्षित अंतराच्या नियमांचेही आवश्यक त्या प्रमाणात पालन होत नसल्याचे दिसून आले. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांचाही वापर मोठ्या प्रमाणावर आढळून आला. ए.पी.एम.सी. प्रशासनाच्या या विषयीच्या कार्यवाहीबाबत आयुक्तांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

याबाबत ए.पी.एम.सी. प्रशासन व संचालक मंडळ यांच्याशी त्वरीत चर्चा करून ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही व यावर प्रतिबंध आणण्याकरता तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या कोव्हीड 19 चा वाढता धोका लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जायचे नसेल तर कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज लक्षात आणून देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एपीएमसी प्रशासनाने अधिक सतर्क रहावे असे निर्देशित केले.
एपीएमसी मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांव्दारे दंडात्मक कारवाया ह्या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींच्या मानाने अत्यंत कमी प्रमाणात होत असल्या तरी त्या तेथील उपस्थितांच्या संख्येच्या मानाने कमी प्रमाणात असल्याचे निरीक्षण नोंदवत आयुक्तांनी याठिकाणी पोलीस व महापालिका अशा संयुक्तपणे धडक कारवाया नियमितपणे करण्याचे संकेत दिले.

कोविड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे ही बाब स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला धोका पोहचविणारी आहे हे विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहचविले जात आहे. तथापि जे नागरिक कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ए.पी.एम.सी. प्रशासन अधिक सतर्क होऊन ही बाब गंभीरपणे घेईल व येत्या दोन ते तीन दिवसात येथील चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुढील काही दिवसात अनपेक्षित भेट देऊन पाहणी होईल त्यावेळी येथील चित्र बदललेले असेल व कारवाई करण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली.