पनवेल : शहरात प्रदूषण करणार्यांवर पनवेल महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित करीत ठोस पावले उचलली आहेत. पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार आतापर्यंत प्रदूषणाला कारणीभूत १६४ बांधकाम विकासकांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. बेकरी आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनाही नोटीसा बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या नोटीसीमुळे प्रदूषण करणारे बांधकाम व्यवसायिक, इतर आस्थापने पालिकेच्या रडारवर आली आहेत.
हेही वाचा…Sunil Tatkare : माणगाव वाहतूक कोंडीमुक्त करणार, मुंबई गोवा महामार्ग यंदाच पूर्ण करणार, तटकरेंची ग्वाही
हिवाळ्यात नैसर्गिक वायुवीजन कमी होते. कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायु प्रदूषणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. १९ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बेकरी व तंदूर करीता पारंपारिक इंधनाऐवजी स्वच्छ इंधन वापरण्यासाठी योजना सादर करण्याचे निर्देश सहसंचालकांना (हवा प्रदुषण नियंत्रण) दिले आहेत.
हेही वाचा…Santosh Deshmukh Murder : हत्येच्या तपासासाठी एसआयटी; आयपीएस तेलींसह 10 जणांचा समावेश
दरम्यान पनवेलमध्ये वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागर्दर्शक सूचनांची अमंलबजावणी विकासकांनी कराव्यात, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी १५ दिवसात उपाययोजना न केल्यास त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेप्रमाणे पनवेलमध्ये बांधकामे थांबविण्यात येतील, अशा कडक सूचना विकासकांना दिल्या आहेत.
प्रभागनिहाय नोटीसीची माहिती
१. अ-प्रभाग-खारघर : १९
२. ब-प्रभाग-कळंबोली : २७
३. क-प्रभाग-कामोठे : ४४
४. ड-प्रभाग-पनवेल : ०१
५. नावडे उपविभाग : ७३
(Edited by Dnyaneshwar Jadhav)