पनवेल : एचएमपीव्ही या विषाणूने भारतात प्रवेश केल्यानंतर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा विषाणू साधारण असला तरी त्याचा प्रादूर्भाव वाढू नये, याची काळजी पनवेल महापालिकेने घ्यायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (7 जानेवारी) सखोल स्वच्छता मोहीम राबवली. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागाने ही स्वच्छता मोहीम राबवली आणि रुग्णालयातून तब्बल 3 टन घनकचरा उचलण्यात आला.
हेही वाचा… Panvel News : तळोजातील बेकायदा धाबे, शेड जमीनदोस्त, पनवेल महापालिका, सिडकोची कारवाई
पनवेल शहरात महापालिकेचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात महापालिका हद्दीतील तसलेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. त्यामुळे रुग्णालय स्वच्छ ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी असते. अशातच एचएमपीव्ही विषाणूची चर्चा सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या निर्देशानुसार हे रुग्णालय आतून आणि बाहेरून धुण्यात आले. सहाय्यक आयुक्त स्मिता काळे यांच्या नियोजनानुसार आणि मार्गदर्शनानुसार ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
हेही वाचा… Mahad Morcha : महाडकरांचा मूक मोर्चा कशासाठी, महाडमध्ये अचानक काय घडलं
यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक, 150 स्वच्छता दूत उपस्थित होते. संपूर्ण रुग्णालय स्वच्छ केल्यानंतर रुग्णालय आणि परिसरात औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी मोहिमेमुळे 3 टन घनकचरा रुग्णालयाबाहेर काढण्यात आला. तसेच रुग्णालयातील शौचालय संदर्भातील तक्रारींचे देखील निवारण करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते यावेळी उपस्थित होते. रुग्णालय स्वच्छ झाल्यामुळे रुग्णांनी तसेच कर्मचाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
(Edited by Avinash Chandane)