पनवेल : तळोजातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात पनवेल महापालिका आणि सिडको यांनी एकत्रित कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी (7 जानेवारी) प्रभाग अ उपविभाग नावडेतील तळोजा फेज 2 मधील बेकायदा बांधकांमे पाडण्यात आली. यात व्यावसायिकांच्या शेड, ढाबे, हॉटेल तसेच अनधिकृत झोपड्यांचा समावेश होता. महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि सिडको अधिकारी यांच्या निर्देशानुसार ही बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
बेकायदा बांधकामविरोधी कारवाईमध्ये तळोजा फेज 2 मधील चार चायनिज सेंटर आणि 5 ढाबे तसेच 55 शेड पाडण्यात आल्या. या मोहिमेत महापालिकेचे दोन जेसीबी, सिडकोचा एक जेसीबी, दोन डंपर, दोन कॅम्पर या वाहनांचा समावेश होता. तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागचे 12 आणि सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे 10 कर्मचारी यात कारवाईत सहभागी झाले होते.
हेही वाचा… Anjali Damania : अंजली दमानियांनी उघड केला वाल्मिक कराडच्या वाईन दुकानाचा काळाबाजार; म्हणाल्या…
पनवेल महापालिकेचे उपायुक्त रविकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी सिडको विकास अधिकारी लक्ष्मीकांत डावरे, सिडको भूमापक महेश पोटवार, वैभव काळे, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण भगत, महापालिका प्रभाग अधिकारी अमर पाटील आदी उपस्थित होते.
(Edited by Avinash Chandane)