पनवेल : तुम्हाला ठावूक आहे का, पनवेल तालुक्यात दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर रामबाग नावाचे भव्य उद्यान आहे? माहीत नसेल तर रविवारचा दिवस राखून ठेवा, कारण या दिवशी या रामबाग उद्यानाचा दुसरा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने ‘महाराष्ट्राचे आम्ही मराठी’ हा पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी रामबाग उद्यानाचा लोकार्पण सोहळा झाला होता.
दुबईच्या वाळवंटात मिरॅकल गार्डन विकसित केलेले आहे. हे गार्डन जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथे याच गार्डनच्या धर्तीवर ‘रामबाग’ हे भव्य उद्यान आहे. या उद्यानाचा रविवारी (22 डिसेंबर) वर्धापनदिन सोहळा आहे. या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापनदिनाच्या सोहळ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, भाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि खर्चातून रामबाग हे उद्यान साकारले आहे. खाडी आणि चिखलच्या भूमीत सुंदर उद्यान फुलवल्यामुळे पनवेल परिसरातील रहिवासी सुट्टीच्या दिवशी उद्यान पाहायला सहकुटुंब जात असतात. तब्बल 14 एकरमध्ये महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारे आणि स्वर्गसुख आनंद देणारे असे हे रामबाग उद्यान आहे. उद्यानाचे भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, आकर्षक पदपथ, चिरेबंदी बांधकाम, सुंदर आसन व्यवस्था, बच्चे कंपनीसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत. सायकांळी विद्युत रोषणाईनंतर उद्यानाचे रुप पालटते. अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारे दृष्य दिसू लागते. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या उद्यानाला भेट देत असतात.
हेही वाचा… Devendra Fadnavis : मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो; फडणवीसांचा विरोधकांना इशारा
पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे म्हसेश्वर मंदिर आहे. या परिसरात रामबाग उद्यान आहे. उद्यानाच्या वर्धापनदिनानिमित्ताने 22 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होईल. त्यानंतर रात्री 8 वाजता अभिनेते पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळे आणि ७० कलाकारांचा संच ‘महाराष्ट्राचे आम्ही मराठी’ हा पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करतील. हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य आहे. सर्वांनी उद्यान पाहायला या, असे आवाहन रामबाग व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री. म्हसेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष सी. एल. ठाकूर, न्हावेचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी केले आहे.
(Edited by Avinash Chandane)