घरनवी मुंबईठेकेदाराला मिळेना डांबर, रस्त्यावर खड्ड्यांची चादर

ठेकेदाराला मिळेना डांबर, रस्त्यावर खड्ड्यांची चादर

Subscribe

नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठाणे ते बेलापूर महामार्गावरील मुकुंद कंपनीच्या प्रवेशद्वारानजीक रस्त्याची देखील पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे.

नवी मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठाणे ते बेलापूर महामार्गावरील मुकुंद कंपनीच्या प्रवेशद्वारानजीक रस्त्याची देखील पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची चाळण झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना खड्डेमय रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. रस्त्याच्या देखभालीसाठी नेमलेल्या ठेकेदाराने भर पावसात मागील २० दिवसात तीनवेळा दगड, मातीचा भराव, पेव्हर ब्लॉक टाकून मलमपट्टी केली होती. त्यानंतर आतातर डांबराऐवजी इतर ठिकाणी खोदलेल्या डांबरी रस्त्याची ढेकळे आणून रस्त्या भरण्याचा प्रताप केला आहे. याबाबत काम करणाऱ्या कामगारांना विचारले असता त्यांनी ठेकेदाराला चक्क डांबर मिळत नसल्याचे सांगितले. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यानंतर निविदा निघाली की डांबर टाकणार असल्याचे सांगत नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.

ठेकेदाराला डांबराची ढेकळे टाकून खड्डे बुजवू नये, असे सूचित करण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येईल.
– अजय पाटील, पालिका अधिकारी

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ ला आणि ठाणे महापालिकेच्या प्रभाग २४ ला जोडणारा मुकुंद कंपनी ते ईश्वर नगर हा मुख्य रस्ता आहे. दोन्ही महापालिकांच्या वेशीवर असल्याने आणि मुकुंद कंपनीकडे जाणार हा रस्ता असल्याने अवजड वाहने, रिक्षा, खासगी बसेस, दुचाकी चालकांची वर्दळ या मार्गावर अधिक असते. पावसाळ्या पूर्वी या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यापूर्वी मुकुंद कंपनी जवळील रस्त्याच्या नाल्याचे देखील काम करण्यात आले होते. परंतु पावसाळ्यात महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. या ठिकाणी नव्याने नाला बांधूनही दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने तलाव झाले होते. पावसामुळे या ठिकाणचा रस्ता खड्डेमय झाला आहे.

दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुकुंद कंपनी परिसरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले होते. पहिल्यांदा खड्डे पडल्यानंतर दगडांचा भराव टाकण्यात आला होता. मात्र दगड वाहून गेल्याने पडलेल्या खड्ड्याची दुसऱ्यांदा डागडुजी करत पेवर ब्लॉक बसवण्यात आले. त्यानंतर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने दोन दिवसापूर्वी ठेकेदाराने या ठिकाणी रस्त्यावर डांबराची ढेकळे टाकून मागील वीस दिवसात तिसऱ्यांदा मलमपट्टी केली आहे. प्रत्यक्षात खड्डा भरून त्यावर डांबर टाकून रस्ता दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असताना ठेकेदाराने अशा प्रकारे मलमपट्टी लावून या ठिकाणी पुन्हा वाहनचालक आणि नागरिकांना अपघाताच्या खाईत लोटले आहे. या ठिकाणी डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदाराला दिलेले असताना त्याठिकाणी करून खड्डे बुजवण्याचा प्रताप सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

(ज्ञानेश्वर जाधव – हे नवी मुंबई प्रतिनिधी आहेत.)

हेही वाचा –

covid vaccination: तृतीयपंथी, फेरीवाले,एड्सग्रस्तांचे फिरत्या केंद्राद्वारे लसीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -