पनवेल : शिवछत्रपतींचा पदस्पर्श झालेल्या प्रबळगडावरील दारुपार्ट्या बंद व्हाव्यात आणि किमान 30-31 डिसेंबर तसेच 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करणाऱ्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दारूकाम करण्यापासून रोखण्यासाठी श्री शिव सह्याद्री संस्था व प्रबळगड दुर्ग संवर्धन समिती महाराष्ट्र सरसावली आहे. पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे प्रबळगड, कलावंतीण सुळका आणि माचीवर सुट्ट्यांच्या कालावधीत ट्रेकरव्यतिरिक्त अनेक हौशी पर्यटकांशी गर्दी होत असते.
पनवेलपासून अंदाजे 8 किलोमीटवरवर मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंग फाट्यावरून प्रबळगडाकडे जाण्याचा रस्ता आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यापासून प्रबळगडावर जाणे सहज शक्य असल्याने दर शुक्रवार रात्रीपासून रविवारपर्यंत पर्यटक आणि हौशी ट्रेकरची वर्दळ असते. माचीवर काही ठिकाणी तंबूत राहण्याची व्यवस्था होत असल्याने तेथे पर्यटकांचे दारूकाम चालते.
राज्यातील गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत आणि शिवराय हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने गड-किल्ल्यांवर गैरवर्तन करू नये, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात अनेक किल्ल्यांवर छुप्या दारूच्या पार्ट्या करून किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरोधात काही वर्षांपासून श्री शिव सह्याद्री संस्था व प्रबळगड दुर्ग संवर्धन समिती महाराष्ट्र संघर्ष करत असून त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. आताही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गडावर अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पनवेल, रायगड पोलीस, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला लवकरच निवेदन देऊ, अशी माहिती प्रबळगड दुर्ग संवर्धन समितीचे सागर मुंढे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.
-
बिबट्याचा वावर
प्रबळगडावर घनदाट जंगल आहे. तिथे बिबट्याचा वावर आहे. शिवाय इतर वन्यप्रजाती आहेत. काही पर्यटक प्रबळगडावर चुल पेटवून मांसाहार बनवतात. त्याचं प्रमाण कमी असले तरी जंगलातील प्राणी वासाने तिकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे प्रबळगडावर मांसाहार न शिजवणे तसेच दारूपार्ट्या बंद करणेच योग्य आहे.
-
कोणत्याही किल्ल्यावर गैरवर्तन नको!
शिवछत्रपतींच्या गड-किल्ल्यावर गैरवर्तन होऊ नये आणि गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा! किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी या, अभ्यास करा आणि परत जा!
– सागर मुंढे, श्री शिव सह्याद्री संस्था व प्रबळगड दुर्ग संवर्धन समिती महाराष्ट्र
(Edited by Avinash Chandane)