नवी मुंबईत दोन दुकाने सील; पाच रेस्टॉरंटवर दंडात्मक कारवाई

महाराष्ट्र शासनाच्या ‘लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र’ आदेशाची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करून कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकडे विशेष दक्षता पथकांच्या माध्यमातून बारकाईने लक्ष दिले जात आहे. शहरातील पॉझिटिव्हीटीचे प्रमाणे आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्धता या आधारावर ५ स्तर निश्चित करून कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून तिसऱ्या स्तरामध्ये असणाऱ्या पालिका क्षेत्रात ३१ विशेष दक्षता पथकांनी विशेष कारवाई करत मागील १ महिन्याच्या कालावधीत ३७३३ व्यक्ती, दुकानदार यांच्याकडून १६ लक्ष ७७ हजार ४०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या स्तर ३ मधील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार दुकाने, आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तथापि त्यानंतरही दुकाने, आस्थापना सुरु ठेवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. पालिका क्षेत्रात जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने, आस्थापना ४ वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस १० हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल तसेच रेस्टॉरंट, बार, पब ४ वाजल्यानंतर सुरु असल्यास ५० हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नियमांचे दुसऱ्या वेळेस उल्लंघन झाल्यास आस्थापना ७ दिवसांकरता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे तिसऱ्या वेळेस नियमांचे उल्लंघन केल्यास या आस्थापना कोरोना महामारीची अधिसूचना संपुष्टात येईपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टपणे नमूद आहे.

या नियमांचे पालन होत असल्याबाबत विशेष दक्षता पथकांमार्फत बारकाईने लक्ष देण्यात येत असून पहिल्या वेळेस १० हजार रुपये दंड भरूनही पुन्हा दुसऱ्यांदा जाहीर वेळेनंतरही दुकान सुरु ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेक्टर ६ ऐरोली येथील गुरुकृप जनरल स्टोअर्स व यश सुपरमार्केट या २ दुकानांवर साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० अन्वये तसेच भारतीय दंड संहितेमधील कलम १८८ नुसार दुकान सिलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.