युवासेनेच्या दणक्यानंतर २० दिवस अडकवलेल्या नवजात बालकाला डिस्चार्ज; नऊ लाखांचे बील माफ

पनवेलमधील इस्त्रायली दफनभूमीचा विकास आणि त्यानुषंगाने चर्चा करण्यासाठी इस्त्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी आणि इस्त्रायल वाणिज्यदूतातील विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर यांनी सोमवारी (१ फेब्रुवारी) आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. इस्त्रायली नागरिकांची दफनभूमीआणि इतर धार्मिक स्थळे पनवेलमध्ये आहेत. या स्थळांचा पालिकेने विकास करण्याची मागणी केली. आयुक्त देशमुख यांनी शोशानी यांना पालिकेच्या वतीने राबवल्या जाणार्‍या योजनांची माहिती दिली.

उपचाराचे अव्वाच्यासव्वा बील आकारून नवजात बालकाला अडकवून ठेवणार्‍या मुजोर हॉस्पिटलला युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या दणक्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळवून देण्यात आला. या बालकावरील उपचारासाठी हॉस्पिटलने चक्क नऊ लाखांचे बील लावले होते. हे बीलही कार्यकर्त्यांनी माफ करून घेतले.

खारघरमधील मदरहूड हॉस्पिटलमध्ये ५ महिन्यांत जन्मलेल्या बाळावर गेले चार महिने उपचार सुरू होते. अकाली (प्रिमॅच्युअर बेबी) बाळ जन्मल्यामुळे इलाज खूप गुंतागुंतीचा होता. रुग्णालयात दाखल करत असताना हॉस्पिटलकडून १५ लाख खर्च अपेक्षित सांगण्यात आला होता. कालांतराने उपचार चालू असताना डॉक्टरांच्या मतानुसार गुंतागुंत वाढल्याचे निमित्त करत नवजात बालकाच्या पालकांवर २७ लाखांचे बील मारण्यात आले. पालकांनी यातील १७ लाखांची रक्कम व्याजाने कर्जाऊ घेतली. उर्वरित रक्कम भरणे पालकांच्या कुवतीबाहेर होते. यासाठी त्यांनी गयावया करून पाहिले. मात्र, पाझर न फुटलेल्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने पैसे न भरल्याच्या कारणास्तव नवजात बालकाला जवळपास २० दिवस सोडले नाही. पैसे भरा आणि डिस्चार्ज घ्या, असा फतवा हॉस्पिटल प्रशासनाने या पालकांवर बजावला.

मूळचे कर्जत येथील रहिवासी असलेल्या वासीम जालानी यांच्याबाबत हे प्रकरण घडले होते. जालानी दाम्पत्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्याकडे तक्रार करत मदत मागितली. खासदार बारणे अधिवेशनाकरिता दिल्लीत असल्याने त्यांनी हे प्रकरण हाताळण्याची सूचना खारघर येथील युवासेना उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांना दिली. राऊत यांनी शिवसेना विभाग संघटक रामचंद्र देवरे, विभागप्रमुख उत्तम मोर्बेकर, युवासेना उपतालुका प्रमुख अनिकेत पाटील, युवासैनिक संकेत पाटील, विजय रोकडे, प्रकाश राजपूत यांना सोबत घेऊन मदरहूड हॉस्पिटलला जाब विचारला. खासदारांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे या पदाधिकार्‍यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगताच प्रशासकीय अधिकारी वरमले. उरलेले बील भरले जाणार नाही, असे बजावत अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला.