उरण : नैसर्गिक वायूपासून वीजनिर्मितीचा देशातील एकमेव प्रकल्प रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये आहे. गॅसवर चालणार एकमेव उपक्रम असून सध्या तो बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पातील बॉयलर आणि स्टीम टर्बाईन नादुरुस्त असल्यामुळे सध्या जेमतेम वीजनिर्मिती होत आहे. हे असेच सुरू राहिले तर हा प्रकल्प बंद पडू शकतो, याकडे लक्ष वेधले जात आहे. चार दशकांपूर्वी म्हणजेच 1983-84 मध्ये उरण तालुक्यात वायू विद्युत केंद्र प्रकल्पाची स्थापना झाली आहे.
9 ऑक्टोबर 2022 रोजी या प्रकल्पात स्फोट घडला आणि या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता तर दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये एक अभियंता आणि दोन कामगारांचा समावेश होता. त्यावेळी ब्लॉक ‘ए’मधील 2 बॉयरल आणि एक स्टीम टर्बाईन नारुदुस्त असल्याकडे देखभाल विभागातील कामगारांनी प्रकल्पातील मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचे लक्ष वेधले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा… Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा पाय खोलात; भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा निकटवर्तीयाचा आरोप
वास्तविक या वायू विद्युत केंद्राची क्षमता 952 मेगावॉट असून प्रत्यक्षात प्रकल्पातील सहा संचांमधून 672 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. मात्र, आता वीजनिर्मिती घटली असून प्रकल्प बंद पडू शकतो, असा दावा मनसेचे उरण तालुका अध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ऊर्जाखाते आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाचे महत्त्व ओळखून उरणमधील वायू विद्युत केंद्रातून जास्तीत जास्त वीजनिर्मिती कशी करता येईल हे पाहावे, अशी मागणी अॅड. सत्यवान भगत यांनी केली आहे. त्याचवेळी प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांची खाते अंतर्गत चौकशी करावी अन्यथा पुन्हा 2022 च्या स्फोटाची पुनरावृत्ती होऊ शकते, याकडे सत्यवान भगत यांनी लक्ष वेधले आहे.
उरण तालुक्यात गॅसवर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प हा सरकारी एकमेव उपक्रम आहे. नियमित गॅसचा पुरवठा केल्यास यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी अॅड. भगत यांनी केली आहे.
(Edited by Avinash Chandane)