उरण : राज्य सरकार मुंबई ते कोकण असा सागरी महामार्ग तयार करत आहे. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गासाठी करंजा ते रेवस असा सागरी सेतू बांधण्यात येईल. मात्र, असा सेतू बांधताना द्रोणागिरी पर्वताला धक्का लावू नका, अशी मागणी करंजा ग्रामस्थांनी केली आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या मार्गात द्रोणागिरी पर्वत आणि द्रोणागिरी मातेसंदर्भात स्थानिकांच्या भावना आहेत. त्यामुळे या पर्वताला सेतूमुळे धक्का लागणार असेल तर ग्रामस्ता कडाडून विरोध करतील, अशी भूमिका करंजा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली आहे.
करंजा ते रेवस सागरी सेतूच्या जागेच्या मोजणी संदर्भात उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या उपस्थितीत उरण तहसील कार्यालयात मंगळवारी (7 जानेवारी) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत द्रोणागिरी पर्वत वाचला पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. करंजा समुद्रकिनारी द्रोणागिरी पर्वत असून या द्रोणागिरी पर्वताला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. द्रोणागिरी किल्ला, त्यावरील द्रोणागिरी मातेचे मंदिर हे ऐतिहासिक वारसा आहेत. यामुळे उरणला ओळख मिळाली आहे. हे महत्त्वाचे वारसे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, मंदिरे करंजा-रेवस सागरी सेतू मार्गामुळे नष्ट होणार आहेत. विकास कामांना विरोध नाही मात्र द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मातेचे मंदिर वाचले पाहिजे, अशी अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.
या बैठकीला प्रांत अधिकारी पवन चांडक, एमएसआरडीसीचे अधिकारी श्री. बोराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरेश पवार, चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे, माजी सभापती अॅड सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा, करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, उपाध्यक्ष देवीदास थळी, मेघनाथ थळी मुळेखंड, कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सरकारला विनंती
करंजा-रेवस सागरी सेतूला उरण आणि करंजा ग्रामस्थांचे सहकार्य राहील. परंतु, ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावता हा मार्ग करण्यात यावा, ही आमची सरकारला विनंती आहे.
– सचिन रमेश डाऊर, सामाजिक कार्यकर्ते, उरण
(Edited by Avinash Chandane)