नवी मुंबई : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे आता उमेदवारांमध्ये ‘कांटे की टक्कर’ झाल्याचे चित्र दिसत आहे. वाढलेल्या टक्केवारीमुळे सर्वच उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. ऐरोली मतदारसंघात ५४.०१ टक्के मतदान झाले आहे. ४ लाख ८९ हजार ५९ मतदारांच्या या मतदारसंघात २ लाख ६४ हजार १२७ मतदारांनी हक्क बजावला आहे. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५०१ पुरुषांनी आणि १ लाख २१ हजार ५८१ महिला तसेच इतर ४५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुरुषांची टक्केवारी ५२.५९ टक्के असून महिलांचे मतदान ५६.१८ टक्के झाले आहे. पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त आहे. ऐरोली मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ४२.५० टक्के मतदान झाले होते. तर यंदा जवळपास १२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. या वाढलेल्या टक्केवारीमुळे ऐरोली मतदारसंघात चुरस रंगली आहे. वाढलेली टक्केवारी कुणाला लाभदायक तर कुणाला त्रासदायक ठरेल याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा –Election 2024 : मुंबई शहरात सरासरी 52.69 टक्के मतदान; 25 पैकी 13 लाख मतदारांनी केले मतदान
ऐरोलीत भाजपचे गणेश नाईक, महाराष्ट्र स्वराज्य पक्षांचे अंकुश कदम, उबाठाचे एम.के.मढवी, शिवसेनेचे बंडखोर विजय चौगुले आणि मनसेचे निलेश बाणखेले यांच्यामध्ये लढत आहे. तरी गणेश नाईक आणि अपक्ष विजय चौगुले यांच्या मतांची चर्चा सुरू झाली आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा हा झोपडपट्टीचे नेतृत्व करणाऱ्या विजय चौगुले यांना होणार की गणेश नाईक यांना होणार, याची सर्वांना उत्कंठा लागली आहे.
बेलापूर मतदारसंघात ५५.२४ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील ४ लाख २३ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख ३० हजार २ मतदारांनी कर्तव्य बजावले. यातील पुरुष मतदारांची संख्या १ लाख २३ हजार २५६ म्हणजे ५४.७७ टक्के आहे. तर १ लाख १० हजार ७४३ महिलांनी मतदान केले असून त्यांची टक्केवारी ५५.७८ टक्के आहे.
हेही वाचा –Gautam Adani : अदानींना अटक करून चौकशी करा…कॉंग्रेस नेते राहुल गांधींची मागणी
बेलापूर मतदारसंघात महिलांचे प्रमाण अधिक आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघात ४५.१५ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानात चांगली वाढ झाली आहे. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात दान टाकणार आहे, याची सर्वांना उत्सुकत लागली आहे.
बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मागील उमेदवारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप नाईक तसेच मनसेचे गजानन काळे, अपक्ष मंगेश आमले आणि विजय नाहटा यांच्यामध्ये थेट लढत आहे. तरी खरी लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात आहे. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत आहे. उमेदवार तीन ते पाच हजारांच्या फरकाने विजयी होतील, अशी चर्चा सुरू आहे.
Edited by : Dnyaneshwar Jadhav