नवी मुंबईला ठरल्याप्रमाणे पाणीपुरवठा करावा; आयुक्तांच्या एमआयडीसीला सूचना

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य ठाणे बेलापूर रस्त्यावर भविष्यात वाहतुक नियोजनाच्या दृष्टीने सर्व्हिस रोड तयार करणे. तसेच उड्डाणपूल बांधणे, याकरता महापालिकेला एमआयडीसीकडून जागेची आवश्यकता भासणार आहे.

navi mumbai
नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य ठाणे बेलापूर रस्त्यावर भविष्यात वाहतुक नियोजनाच्या दृष्टीने सर्व्हिस रोड तयार करणे. तसेच उड्डाणपूल बांधणे, याकरता महापालिकेला एमआयडीसीकडून जागेची आवश्यकता भासणार आहे. याकरता महापालिकेमार्फत एमआयडीसीकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. एमआयडीसीला ठाणे बेलापूर रस्त्यानजिक कोपरखैरणे महापे भागात सर्व्हिस रोडशेजारी छोटे भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. हे भूखंड वाटप केल्याने रस्त्यांवर गाड्यांची पार्किंग होऊन या भागात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

याबाबत महापालिकेमार्फतही एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आला होता. या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एमआयडीसीच्या स्थानिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून याविषयी सविस्तर चर्चा केली. महापालिकेची भूमिका विषद करत वरिष्ठ पातळीवर याबाबत पाठपुरावा करण्याची सूचना केली. यावेळी एमआयडीसीचे नवी मुंबईतील क्षेत्रीय अधिकारी सतीश बागल, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई व मालमत्ता विभागाचे उप आयुक्त जयदीप पवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत एमआयडीसीकडून पालिका क्षेत्रासाठी पुरविल्या जात असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये ५ ते ७ द.ल.लि. पाणी कमी मिळत असल्याने ऐरोली, समता नगर, साईनाथ वाडी, ऐरोली नाका तसेच एमआयडीसी बाजूकडील दिघा, घणसोली व तुर्भे विभागातील काही भागात पाणी पुरवठा कमी होत असल्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे.

या अनुषंगाने एमआयडीसीने नियोजित पाणी पुरवठा पूर्णपणे करावा, असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. तसेच यावर एमआयडीसीमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मान्य केले. महापालिकेकडून एमआयडीसीकडे नागरी सुविधांकरता विविध भूखंडांची मागणी करण्यात आली असून त्याविषयीही तत्परतेने निर्णय घ्यावा, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी या बैठकीत सांगितले.

हेही वाचा –

एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ; नेमकं काय घडलं?