घरनवी मुंबईझोपडपट्टी, गावठाणांमध्ये कचरामुक्तीचे 'झिरो वेस्ट मॉडेल' 

झोपडपट्टी, गावठाणांमध्ये कचरामुक्तीचे ‘झिरो वेस्ट मॉडेल’ 

Subscribe

 उपक्रमातून कचरावेचक महिलांचे सक्षमीकरण 

दररोज निर्माण होणा-या कच-याचे घरातच ओला व सुका असे वर्गीकरण करून तो महानगरपालिकेच्या कचरागाड्यांमध्येही वेगवेगळा दिला जाणे घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार अनिवार्य आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  याबाबत प्रभावी कार्यवाही करण्यात येत असून दररोज कचरा संकलन करणा-या स्वच्छता कर्मचा-यांमार्फत नागरिकांची मनोभूमिका तयार केली जात आहे.
 नागरी वसाहती तसेच सोसायटी भागांतून याला चांगला प्रतिसाद मिळत असून गांवठाण व झोपडपट्टी भागातही अशाचप्रकारे घराघरातून ओला व सुका कचरा वर्गीकरण व्हावे आणि तो वेगवेगळा संकलित व्हावा याकरिता महानगरपालिकेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. याबाबत स्त्री मुक्ती संघटनेशी सामंजस्य करार करण्यात आला असून कचरावेचक महिलांमार्फत गांवठाण व झोपडपट्टी भागातील घराघरांतून ओला व सुका अशा वेगवेगळ्या स्वरूपात कचरा संकलित केला जात आहे.
   सकाळी 7 वाजल्यापासून या महिला कचरा संकलन सुरू करीत असून एक महिला साधारणत: 9 ते 9.30 वाजेपर्यंत  250 घरातील कचरा संकलन करीत आहे. याकरिता त्यांना 120 लिटर क्षमतेच्या हिरव्या व निळ्या कचरापेट्या देण्यात आल्या आहेत. या कचरापेट्यांना चाके लावलेली असल्याने या महिलांना विनासायास संकलित कच-याची वाहतुक करणे शक्य होत आहे. हा संकलित ओला कचरा वस्तीच्या एका जागी बनविण्यात आलेल्या शेडमधील कम्पोस्ट पीटच्या ठिकाणी आणला जात असून त्यावर खतनिर्मिती  प्रक्रिया केली जात आहे. सुका कचरा या कचरावेचक महिलांमार्फत रद्दीवाले, भंगारवाले यांना विक्री केला जात असून त्यामधून त्यांना उदरनिर्वाहासाठी रक्कम प्राप्त होत आहे.
 सध्या तुर्भे विभागातील हनुमाननगर व इंदिरानगर झोपडपट्टी, कोपरखैरणे विभागातील अडवली भूतावलीगाव, ऐरोली विभागातील समतानगर याठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्याला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिघा विभागातील बिंदुमाधव नगर तसेच गणेशनगर येथेही काही दिवसांतच शून्य कचरा प्रकल्प सुरू होत आहे. सदर संकल्पना गतिमानतेने इतर गावठाणे व झोपडपट्ट्यांमध्येही राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या अभिनव उपक्रमाव्दारे कचरा वेचून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणा-या कचरावेचक महिलांना हक्काचा व नियमित रोजगार उपलब्ध झाला असून कच-याची नियमानुसार योग्य विल्हेवाट लावण्याप्रमाणेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेने उचलेलेले हे सकारात्मक यशस्वी पाऊल आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -