५ वर्षांनंतर प्रथेनुसार गडावर बोकडबळी

सप्तशृंगगड : दसर्‍याच्या दिवशी सप्तश्रुगी देवी मंदिराच्या पायर्‍यांवरील दसरा टप्प्यावर पंरपरेनुसार पूर्वीपासून सुरु असलेल्या बोकडबळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केली होती. प्रशासनाच्या निर्णया विरुध्द आदिवासी विकास संस्था, धोंडाबे, ता.सुरगाणा या संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या जनहित याचिकेवर गुरुवारी (दि. २९ सप्टेंबर) उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याचे बाजूने निकाल देत न्यायालयाने अटी शर्तीनुसार बोकडबळी देण्याची प्रथा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे.  त्यानुसार यंदा पाच वर्षांनंतर बोकडबळी देण्यात आला.

सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या सांगते दरम्यान विजयादशमीला बोकडाची गावातून सवाद्य मिरवणूक काढून गडावरील दीपमाळ परिसरातील दसरा टप्प्यावर बोकड्यास नेवून पांरपारिक पध्दतीने पूजाअर्चा करत बळी देण्याची पूर्वापार चालत असलेली प्रथा सुरु होती. यावेळी बोकडबळी देतांना सप्तश्रृंगी देवी न्यासाच्यावतीने मानवंदना म्हणून हवेत गोळीबार करण्याची पंरपरा होती. मात्र ११ सप्टेंबर २०१६ रोजी दसर्‍याच्या दिवशी परंपरेनुसार बोकड बळी देण्याचा विधी सुरु असतांना ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटून भिंतीवरील दगडावर आपटलेल्या गोळीचे छरे उडून १२ भाविक जखमी झाले होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नव्हती.

घटनेनंतर, विधीत सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने भविष्यात या बोकडबळीच्या प्रथेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केल्यामुळे सप्टेंबर २०१७ पासून गडावरील दसरा टप्पा व ट्रस्टच्या हद्दीत बोकड बळी व हवेत गोळीबार करण्याच्या प्रथेस तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बंदी घातली होती. तसेच प्रशासनाने सदर बंदीचा निर्णय घेतांना ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आदिवासी बांधव आदींना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केलेला होता. तसेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूर येथे भवानी मातेच्या मंदिरासमोर भवानी मंडपात तसेच तुळजापूर येथेही नवमीच्या दिवशी हजारो भाविक व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थित बळी देण्याची परंपरा सुरु असतांना सप्तशृंगी गडावरील घातलेल्या बंदीचा निर्णय लोकभावना, श्रध्दा व धार्मिक भावना दुखवणारी आहे.

देवी महात्म असलेल्या दुर्गासप्तशती, नवचंडी स्त्रोत्र आणि इतर धार्मिक ग्रंथांतही पशुबळी देण्याबाबत उल्लेख आढळतो. याबाबत सप्तशृंगी गड, नांदुरी, मोहनदरी, गोलदरी, दरेगांव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनास अटी-शर्तीनुसार दसरा टप्प्यावर बोकड बळी देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सातत्याने होत असल्याचे याचिकाकर्तीने याचिकेत उल्लेख करीत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

दरम्यान, जनहित याचिकेवर गुरुवारी, ता. २९ रोजी सुनावणी झाली असून यात न्यायालयाने याचिकाकर्ते आदिवासी विकास संस्था, धोडंबे सह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवन, तहसिलदार कळवण, पोलिस निरीक्षक कळवण, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगी गड व नांदुरी ग्रामपंचायत यांनी सहमतीने प्रशासनाने बंद केलेली प्रथा पूर्वरत पणे अटी शर्तीनूसार करण्यास हरकत नसल्याची एकत्रीरीत्या मान्य असल्याचे पत्र न्यायालयात सादर केले. असतांना न्यायालयाने बोकड बळीची बंदी उठवत प्रथा पंरपरेनूसार बोकड बळी देण्यास परवानगी दिली आहे. त्यामूळे ५ ऑक्टोंबर रोजी झालेल्या यज्ञ आहूतीचा बोकड बळी विधी हा गडावरील दसरा टप्पा येथे पाच वर्षानंतर पुन्हा झाला असल्याने भाविक, सप्तश्रृंगी गड, नांदुरी, मोहनदरी, दरेगाव, मार्केड पिंप्री ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

काय आहे बोकड बळीची प्रथा

आदिवासी समाजात सप्तशृंगी देवीचं स्थान महत्त्वाचं आहे. कोणतेही धार्मिक कार्य करताना बोकड बळी देण्याची आदिवासी समाजात प्राचीन परंपरा आहे. तसेच दसर्‍याला देखील नवस पूर्ण करण्यासाठी गडावर बोकड बळी दिला जातो. नवरात्रौत्सवाला दसर्‍याला सांगता होते. त्यानिमित्ताने सप्तशृंगी गडावर नवस पूर्ण करण्यासाठी बोकड बळी देण्याची प्राचीन प्रथा आहे. नवस पूर्ण करण्यासाठी आणलेल्या बोकड्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. गडावरील दीपमाळा परिसरात दसरा टप्प्यावर बळी देण्यासाठी आणलेल्या बोकडाची पूजा केली जाते. त्यानंतर न्यासाच्यावतीने मानवंदना देण्यासाठी हवेत गोळीबार केला जातो. त्यानंतर बोकड बळी दिला जातो.